Join us  

थकबाकी वसुलीसाठी सुलभ हप्त्यांचा पर्याय !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 6:35 PM

Recovery of arrears! : कृषीव्यतिरिक्त सर्व ग्राहकांसाठी नवे धोरण

५ ते १२ हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मुभा   

मुंबई : वाढीव वीज बिले आणि कोरोनामुळे झालेल्या आर्थिक कोंडीमुळे लाखो वीज ग्राहकांना बिलांचा भरणा करणे शक्य होत नसून महावितरणची थकबाकी लक्षणीयरीत्या वाढू लागली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना बिलांचा भरणा करण्यासाठी तीन ते बारा सुलभ हप्त्यांचा पर्याय महावितरणच्यावतीने दिला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हाती आली आहे. थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या वीज ग्राहकांसह सध्या चालू बिलांचा एकरकमी भरणा करू न शकणा-या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महावितरणची एकूण थकबाकी ५९ हजार कोटींची असून त्यापैकी ४२ हजार कोटी ही कृषी पंपांची थकबाकी आहे. शेतक-यांकडून वीज बिलांची वसूली राजकीय हस्तक्षेपामुळे अडचणीची होत असून उर्वरित १७ हजार कोटींची वसूली करण्यासाठी महावितरणच्यावतीने हे नवे धोरण ठरविले जात आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत केलेल्या वीज ग्राहकांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी वन टाईम सेटलमेंट पँकेज महावितरणच्यावतीने सध्या दिले जाते. कोरोना संक्रमणामुळे अनेक वीज ग्राहकांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. आजवर नियमितपणे बिलांचा भरणा करणा-या ग्राहकही त्याच भरडले जात आहेत. वीज पुरवठा खंडीत केलेल्या अनेक औद्योगिक ग्राहकांना पुन्हा आपले उद्योग सुरू करायचे आहेत. परंतु, त्यांना वन टाईम सेटलमेंट आणि हप्त्यांचे धोरण हे एकाच पँकेजमध्ये हवे आहे. अनेक ठिकाणी मुळ बिलांच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त असून ती वसूली जवळपास अशक्य झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आकर्षक पँकेज देणे गरजेचे आहे. सध्या या थकबाकी वसुलीसाठीचे पँकेज मध्यवर्ती कार्यालयातून मंजूर केले जात असून त्याचे स्थानिक पातळीवर विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. तसेच, पुनर्जोडणी करताना स्थानिक अधिका-यांकडून खंडीत काळातील फिक्स्ड चार्जची मागणीसुध्दा गैरवाजवी ठरते. त्यामुळे या विस्कळीत स्वरुपाच्या कारभारावर मात करण्यासाठी एकात्मीक धोरण ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे असेल योजनाचे  ढोबळ स्वरूप

लघूदाब, उच्चदाब वीज ग्राहकांसाठी हे धोरण लागू असेल. त्यात कृषी पंपांचा समावोश नसेल.   बिलांबाबत कोणताही कायदेशीर वाद न नसलेल्या किंवा तो वाद मागे घेण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना याचा फायदा घेता येईल. चालू बिलाची रक्कम थकली असेल तर त्यांना कोणत्याही स्वरुपाचे डाऊन पेमंट करण्याची गरज नसेल. अन्य ग्राहकांना मात्र ३० टक्के डाऊनपेमंट करून हप्त्यांच्या सुविधाचे फायदा घेता येईल. तीन ते १२ हत्प्यांमध्ये बिल भरण्याची परवानगी दिली जाईल.  हप्त्यांच्या कालावधीत दरमहा वीज बिलांचा भरणा मात्र नियमित वेळेत करावा लागेल. तो न केल्यास हप्त्यांची सुविधा रद्द केली जाईल. आर्थिक वर्षात एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्याज आकारणी केली जाणार आहे. या योजनेचा सविस्तर आराखडा महावितरणच्यावतीने लवकरच जाहीर केला जाणार आहे. 

टॅग्स :वीजमहावितरणमुंबई