Join us  

पूर्व-पश्चिम महामार्ग घेणार वाहतूककोंडीतून मोकळा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 9:41 AM

मुंबई महापालिकेने शोधला भुयारी, उन्नत मार्गाचा तोडगा

मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, तसेच वाहतुकीचे विभाजन करण्यासाठी मुंबई महापालिकेने ८०० कोटी रुपयांचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या दोन्ही महामार्गांवरील चार महत्त्वाच्या जंक्शनवर भुयारी आणि उन्नत मार्ग बांधले जाणार आहेत.

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग २०२२ सालापर्यंत मुंबई महापालिकेच्या ताब्यात आले. त्यापूर्वी या  महामार्गांची देखरेख आणि डागडुजी करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) होती. या दोन्ही महामार्गांवरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महामार्ग रुंदीकरणास फार वाव राहिलेला नाही. पूर्व द्रुतगती मार्गालगत मोठ्या पट्ट्यात पाणथळ आणि मिठागारांच्या जमिनी आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी, तसेच एकाच ठिकाणी वाहने खोळंबून त्यांच्या रांगा लागू नयेत, यासाठी भुयारी मार्ग आणि उन्नत मार्गांचा पर्याय शोधण्यात आला आहे. 

या जंक्शनवर राबविणार प्रकल्प :

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुधीर फडके उड्डाणपूल - उड्डाणपुलावरून महामार्गावर जाण्यासाठी  थेट मार्ग नसल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ओवरीपाडा मेट्रो स्थानक जंक्शन  येथे वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी दक्षिण मुंबईच्या दिशेने एकदिशा भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर थेट प्रवेश करता येईल. 

बीकेसी कनेक्टर विस्तार : बीकेसी  कनेक्टर येथून दक्षिण मुंबईला थेट जोडणी नाही. त्यामुळे सायन  आणि कुर्ला पट्ट्यात वाहतुकीची समस्या जाणवते.  त्यासाठी इंग्रजी ‘यू’- अद्याक्षराच्या धर्तीवर पूल बांधला जाईल.

मिलन सबवे जंक्शन : वाकोला जंक्शन  आणि सांताक्रूझ पूर्वपट्ट्यात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.

१)  जंक्शनच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे याच ठिकाणी या पर्यायांचा वापर केला जाणार आहे.   

२)  या प्रकल्पासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या, तर याच महिन्यात    कामाला  सुरुवात होईल. 

३)  हे प्रकल्प एक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

४) विलेपार्ले हनुमान रोड उड्डाणपूल : कॅप्टन विनायक गोरे पूल आणि विलेपार्ले पूर्व  या पट्ट्यात वाहतूक कोंडी होते. दक्षिण मुंबईच्या दिशेने थेट जाण्यासाठी  पर्याय मिळावा, यासाठी वाहने आणि पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकावाहतूक कोंडी