Join us

राजन यांना ई-मेलने धमकी

By admin | Updated: April 17, 2015 01:41 IST

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ई-मेलवरून हत्येची धमकी मिळाली आहे. या ई-मेलमध्ये इसीस संघटनेचा उल्लेख असून, सायबर पोलिसांकडून तपास केला जात आहे.

मुंबई : आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ई-मेलवरून हत्येची धमकी मिळाली आहे. या ई-मेलमध्ये इसीस (इस्लामिक स्टेट आॅफ इराण अ‍ॅण्ड सीरीया) या दहशतवादी संघटनेचा उल्लेख असून, सायबर पोलिसांकडून तपास केला जात आहे.राजन यांच्या कार्यालयीन ई-मेल अकाउंटवर २६ मार्च रोजी ्र२्र२.583847@ॅें्र’.ूङ्मे या अ‍ॅड्रेसवरून धमकीचा ईमेल आला. आरबीआय अधिकाऱ्यांनी ३१ मार्चला या ई-मेलबाबत पोलिसांत माहिती दिली. गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा नोंदविला. हत्येचे कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्यापेक्षा जास्त पैसे दिल्यास आम्ही विचार करू, असे ई-मेल धाडणाऱ्याने नमूद केले असले तरी कुठेच रकमेचा उल्लेख केलेला नाही. राजन घाबरतील, पैसे देतील या अपेक्षेने हा ई-मेल पाठवल्याची शक्यता त्यातील मजकूर वाचून वाटते, असे तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. हा ई-मेल नायजेरीयन भामट्यांकडून पाठविल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. सर्व यंत्रणांची मदत घेऊन तपास सुरू असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी) धमकीचा ई-मेल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी राजन यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला व त्यांच्या सुरक्षेत वाढ केली. याबाबत पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांना विचारले असता, आम्ही राजन यांच्या सुरक्षेसाठी योग्य ते उपाय योजले आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र जास्त तपशील देणे टाळले.आयपी अ‍ॅड्रेससाठी गुगलची मदत : सायबर सेलने ईमेल गुगलशी संपर्क साधून राजन यांना आलेल्या ई-मेलचा आयपी अ‍ॅड्रेस आणि अन्य तपशील मागविले आहेत. तपासात हा ईमेल प्रॉक्सी आयपीवरून पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एकाचवेळी हा ई-मेल अ‍ॅड्रेस अमेरिका, आॅस्ट्रेलिया, इटली, नायजेरीया, बेल्जियम, जर्मनी, हाँगकाँग, युक्रेन, कॅनडा, पोलंड येथून हाताळण्यात आल्याची बाबही तपास अधिकाऱ्यांना समजली आहे.