Join us  

म्हाडाच्या दुकानांचा ई-लिलाव; मुंबईतील दुकानांना बोली तर कोकणाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 3:44 AM

प्रतीक्षानगर येथील एका दुकानाची मूळ किंमत २२ लाख ५० हजार इतकी होती, या दुकानाला ५२ लाख, तर ४० लाख मूळ किंमत असलेल्या दुकानासाठी ८६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या २७६ दुकानांचा ई-लिलाव शनिवारी पार पडला. या लिलावामध्ये म्हाडाने तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा प्रथमच वापर करण्यात आला. लिलावात मुंबईतील दुकानांना मूळ किमतीपेक्षा अधिक किंमत मिळाली आहे. मात्र, कोकणातील काही दुकानांना अल्प, तर काही दुकानांना अजिबातच प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, विजेत्यांची नावे १ जूनला सायंकाळी ५ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव ही यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर केली नसल्याचे म्हाडाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मुंबई मंडळांतर्गत असलेल्या प्रतीक्षा नगर-सायन, न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावे नगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी-मालाड येथील २०१ गाळ्यांचा समावेश होता, तर कोकण मंडळांतर्गतच्या विरार बोळींज, वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथील ७७ सदनिकांचा समावेश होता.

यातील न्यू हिंद मिल-माझगाव येथील दुकानांची किंमत ७९ लाख रुपये इतकी होती. या दुकानांना १ कोटी ४६ लाख ३० हजार इतकी उच्च बोली लावण्यात आली. तसेच तुंगा पवई येथील दुकानांना १ कोटी ९ लाख, तर येथील दुसऱ्या दुकानांना १ कोटी २५ लाख इतकी बोली लावण्यात आली आहे. प्रतीक्षानगर येथील एका दुकानाची मूळ किंमत २२ लाख ५० हजार इतकी होती, या दुकानाला ५२ लाख, तर ४० लाख मूळ किंमत असलेल्या दुकानासाठी ८६ लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

टॅग्स :म्हाडा