Join us  

वडाळ्यात विहिरीत पडून कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 1:52 AM

वडाळा येथील श्रीराम इंडस्ट्रीयल इस्टेट कम्पाउंडमध्ये साफसफाई करतेवेळी विहिरीतून मोटारीच्या साहाय्याने पाणी काढत असताना एका कामगाराचा त्यात पडून मृत्यू झाला.

मुंबई : वडाळा येथील श्रीराम इंडस्ट्रीयल इस्टेट कम्पाउंडमध्ये साफसफाई करतेवेळी विहिरीतून मोटारीच्या साहाय्याने पाणी काढत असताना एका कामगाराचा त्यात पडून मृत्यू झाला. चंद्रकांत विचारे (५२) असे त्या कामगाराचे नाव आहे़ या प्रकरणी आर.ए.के मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. विचारे हे त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने श्रीराम इंडस्ट्रीयल इस्टेट कम्पाउंड परिसरात साफसफाई करत होते. त्याच वेळी विचारे येथील विहिरीतून मोटारीच्या साहाय्याने पाणी काढण्यासाठी गेले. विहिरीवर असलेल्या दोन फरशांपैकी एकावर पाय ठेवून ते पाणी काढत असताना फरशीचे दोन भाग झाले व ते विहिरीत पडले.बराच वेळ झाला, तरी विचारे न दिसल्याने सहकाऱ्यांनी शोध सुरू केला. ते विहिरीत पडल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलीस, तसेच अग्निशमन दलाला याबाबत कळविले.घटनेची वर्दी लागताच दोघेही तेथे दाखल झाले. अखेर सायंकाळी त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. विचारे हे वरळी बीडीडी चाळीतील रहिवासी आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.