Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवराजांच्या काळात साहित्यिकांना बहुमान

By admin | Updated: April 25, 2015 22:18 IST

‘शिवाजी महाराजांची ग्रंथसंपदा मोठी होती. त्याला ‘पोथीखाना’ म्हणत. त्यांच्या राज्यात कवी, साहित्यिकांना खूप मान होता.

कर्जत : ‘शिवाजी महाराजांची ग्रंथसंपदा मोठी होती. त्याला ‘पोथीखाना’ म्हणत. त्यांच्या राज्यात कवी, साहित्यिकांना खूप मान होता. कुठल्याही प्रदेशातून आलेल्या कवीला भेटण्यासाठी महाराज नेहमीच उत्सुक असत. त्याचा बहुमान करून त्यांच्याकडून विविध लिखाण करून घेणे त्यांना आवडत असे,’ अशी मौलिक माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी दिली. कर्जतमधील लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपतींचा जीवनपट श्रोत्यांपुढे उलगडला. ते म्हणाले, रायगडावरील ग्रंथ, महाराजांची पत्रे, विविध साहित्य आगीमध्ये भस्मसात झाले. पॅरिस, लंडनमध्ये तेथील राजांच्या जीवनावर जेवढी ग्रंथसंपदा आहे, तेवढी पानेही शिवाजी राजांवर आपल्याकडे लिहिलेली नाहीत. साहित्यिक ही आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे. एखादे वादग्रस्त पुस्तक आले की त्यावर बंदी येते. तसे न करता त्याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पुरंदरे यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार सुरेश लाड, मुख्याधिकारी दादाराव अटकोरे, राजाभाऊ काळे, डॉ. उज्ज्वला कुलकर्णी, डॉ. कामत, उद्योजिका स्मिता म्हामुणकर, अ‍ॅड. कृतिका भोईर, दत्तात्रय बागाईतकर, धनंजय हिंगमिरे , स. दा. अनगरकर, बाळकृष्ण रेडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विजया पेठे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यवाह दीपक बेहरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा सादर करून ई - ग्रंथालय सुरू करण्याचा विचार असून वाचनालयाच्या ग्रामीण भागातील किरवली व गौरकामत या गावांमध्ये शाखा सुरू करण्याचे सांगितले. यानंतर स्मिता म्हामुणकर, कृतिका भोईर, दत्तात्रय बागाईतकर, बाळकृष्ण रेडेकर, धनंजय हिंगमिरे, स. दा. अनगरकर आदींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मानसी जोशी यांनी पसायदान सादर केले. रामदास महाराज पाटील, रघुनाथ जाधव, हेमलता वैद्य, रमेश मुंढे, राजाभाऊ कोठारी, दिलीप गडकरी, शाम जोशी, नारायण जाधव, पूजा थोरवे, अस्मिता मोरे, प्रभाकर करंजकर, महेश वैद्य आदींसह असंख्य कर्जतकर उपस्थित होते. (वार्ताहर)