Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या काळात सरकार कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 04:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा काळात कामगारांना कामावरून कमी न करण्याचे आवाहन उद्योजकांना करण्यात आले आहे. या काळात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा काळात कामगारांना कामावरून कमी न करण्याचे आवाहन उद्योजकांना करण्यात आले आहे. या काळात सरकार कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने ‘श्रमकल्याण युग’ मासिकाचे प्रकाशन आणि दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त कामगारांच्या ११२ पाल्यांचा ऑनलाइन गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुश्रीफ यांनी लिखित संदेश पाठविला होता. त्यांनी लिहिले होते की, श्रमकल्याण युग हे मासिक राज्याच्या कामगार विभागाचे प्रतिनिधित्व करणारे असावे. यामुळे कामगार, शासन व मालक यांच्यात समन्वय साधला जाईल.

कामगार राज्यमंत्री बच्चू कडू व कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल यांच्या हस्ते या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोडबोले, ‘मीडिया आर अँड डी’चे संचालक दीपक कवळी, करिअर काउंसिलर स्वाती साळुंखे आदी उपस्थित होते.

या वेळी बच्चू कडू म्हणाले, देशासाठी शेतकऱ्यांएवढेच कामगारही महत्त्वाचे आहेत. कामगारांचे हात थांबल्यास देश ठप्प होऊ शकतो. त्यामुळे कामगारांना त्यांच्या श्रमाची प्रतिष्ठा मिळायलाच हवी. तर, ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे, त्याचा रोड मॅप आताच तयार करा व त्या दिशेने वाटचाल करा. इंटरनेटवर सर्व माहिती मिळत असल्याने त्याचा योग्य वापर करा, असे मार्गदर्शन सिंघल यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी केले तर आभार मनोज बागले यांनी मानले.

..................................