Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतराबाबत प्रकल्पग्रस्तांची दुटप्पी भूमिका

By admin | Updated: August 19, 2016 01:32 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत विमानतळाच्या उभारणीला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांचा

- कमलाकर कांबळे, नवी मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत विमानतळाच्या उभारणीला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांचा रेटा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे गावांच्या स्थलांतराचे काम रखडले आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत गावांचे स्थलांतर करणार नाही, असा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. विशेष म्हणजे एकीकडे स्थलांतरासाठी तयारी दर्शवायची आणि दुसरीकडे विरोध करायचा, प्रकल्पग्रस्तांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे सिडकोची कोंडी झाली आहे. विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी पनवेल तालुक्यातील दहा गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे या गावांतील साडेतीन हजार कुटुंबे निर्वासित होणार आहेत. त्यांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. बाधित होणाऱ्या या ग्रामस्थांना त्यांच्या मूळ बांधकाम क्षेत्राच्या तीन पट क्षेत्राचा भूखंड देण्यात येणार आहे. त्याची सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. पुढील सहा-सात महिन्यांत स्थलांतरित होणाऱ्या या बांधकामधारकांना प्रत्यक्ष भूखंडांचा ताबा देण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधितांनी भाडेतत्त्वावर स्वत:च्या निवासाची व्यवस्था करावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांना १८ महिन्यांचे घरभाडे दिले जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या नेत्यांनी त्याला मान्यताही दिली होती. त्यानुसार सिडकोने गावांच्या स्थलांतरासाठी १ जुलैचा मुहूर्त निश्चित केला आहे. १ जुलै २0१६ ते ३१ डिसेंबर २0१७ या १८ महिन्यांसाठी हे पॅकेज असणार आहे. स्थलांतरित होणाऱ्या बांधकामधारकांना १८ महिन्यांचे एकरकमी आगाऊ घरभाडे दिले जाणार आहे. त्यासाठी १६ जूनपासून सिडको भवन येथे विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. दीड महिना झाला तरी आतापर्यंत एकाही प्रकल्पग्रस्ताने स्थलांतरासाठी या कक्षाला संपर्क साधलेला नाही. गावांचे स्थलांतर झाल्याशिवाय विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेमुळे सिडको चांगलीच पेचात अडकली आहे. दिलेल्या आश्वासनांची अगोदर अंमलबजावणी करा, निर्णय न झालेल्या प्रश्नांवर चर्चा करा, प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, मगच स्थलांतर केले जाईल, असा पवित्रा विमानतळबाधितांनी घेतला आहे. स्थलांतराची तयारीविमानतळाचा प्रकल्प विनाविघ्न उभारला जावा, असे स्थालांतरी होणाऱ्या दहा गावांतील अनेकांचे मत आहे. त्यासाठी स्थलांतर करण्यासही अनेकांनी तयारी दर्शविली आहे. खासगीत बोलताना किंवा सिडकोच्या संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अनेकजण स्थलांतरासाठी तयार असल्याचे बोलून दाखवितात. विशेष म्हणजे दहा गावांतील स्थानिक ग्रामस्थ, त्यांचे पुढारी, प्रकल्पग्रस्तांचे नेते आदींनी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची भेट घेतली.