Join us  

अर्धवटरावांचा रशियातही डंका; वर्ल्ड पपेट्री कार्निवलमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 4:39 AM

बोलक्या बाहुल्यांनी भारताचे नाव जगभरात पोहोचविलेल्या शब्दभ्रमकार रामदास पाध्येंच्या ‘अर्धवटराव’ या तरुण बाहुल्याचे सध्या परदेशी नागरिक प्रचंड फॅन झाले आहेत.

- अजय परचुरे मुंबई : बोलक्या बाहुल्यांनी भारताचे नाव जगभरात पोहोचविलेल्या शब्दभ्रमकार रामदास पाध्येंच्या ‘अर्धवटराव’ या तरुण बाहुल्याचे सध्या परदेशी नागरिक प्रचंड फॅन झाले आहेत. फक्त १०० वर्षांचे असलेले अर्धवटराव सध्या रशियातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. निमित्त आहे वर्ल्ड पपेट्री कार्निवलचे. रशियाच्या येकाटीनबर्ग शहरात भरलेल्या या पपेट्री कार्निवलमध्ये आपल्या अचूक विनोदी टायमिंग आणि संवादफेकीमुळे या कार्निवलमध्ये आलेल्या प्रत्येकाच्या तोंडी फक्त अर्धवटरावांचा जयघोष आहे. जगातल्या नामांकित शब्दभ्रमकारांच्या या कार्निवलमध्ये रामदास पाध्येंचा अर्धवटराव हा एकमेव बाहुला तमाम भारतीयांचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करीत आहे.अर्धवटरावांनी वयाची सेंच्युरी गाठल्यानंतर रामदास पाध्ये आणि कुटुंबीयांनी अर्धवटरावांची महती साऱ्या जगाला कळावी यासाठी ‘कॅरी आॅन पाध्ये’ या कार्यक्रमाचे प्रयोग परदेशात सादर करण्याचा निर्णय घेतला. परदेशातही अर्धवटरावांना तुफान प्रतिसाद मिळाला. गप्पा मारताना मध्येच डोळा मारणे, बोलता-बोलता आपली मान गरागरा फिरविणे, आपल्या बोलण्याने समोरच्याची टोपी उडविण्याच्या अर्धवटरावांच्या अनोख्या स्टाईलने भारतीयांसोबतच परदेशी प्रेक्षकांनाही खळखळून हसविले. त्यामुळेच मलेशिया, चीनमधल्या पपेट्री फेस्टिव्हलमध्ये पाध्येंनी भाग घेतला आणि आपल्या भारतीय बाहुल्यांना जगाच्या व्यासपीठावर एक मानाचे स्थान निर्माण करून दिले. त्याचाच पुढचा भाग म्हणून रशियातील या कार्निवलमध्ये रामदास पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना त्यांच्या अनोख्या बाहुल्यांसह मानाचे निमंत्रण देण्यात आले होते.रामदास पाध्ये आणि त्यांची पत्नी अपर्णा पाध्ये यांची कला त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे त्यांचा मुलगा सत्यजीत आणि सून ऋजुता पाध्ये यांनीही समर्थपणे सुरू ठेवली आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रशियाच्या कार्निवलमध्ये भारतातर्फे रामदास पाध्येंची नात आणि तिसºया पिढीतील छोट्याशा नीवा पाध्येनेही शब्दभ्रमकार प्रकारात आपला चंचूप्रवेश केला आहे. अर्धवटराव,आवडाबाई यांच्या संवादांनी रशिया आणि जगभरातून आलेल्या तमाम शब्दभ्रमकारांनाही मोहिनी घातली आहे. यापूर्वी मलेशिया, चीन आणि तमाम देशांमध्ये १०० वर्षांच्या अर्धवटरावांना तेथील रसिकांनी आपल्या गळ्यातील ताईत बनविले होते. त्याचीच पुनरावृत्ती रशियातील या कार्निवलमध्ये झाली. आम्हाला इथे अफाट प्रेम मिळाले. अर्धवटरावांना जवळून पाहण्यासाठी रसिकांनी प्रेक्षागृहात रांगा लावल्या होत्या. त्यामुळे भारतीय म्हणून आपली कला सादर करण्याचा आम्हाला अभिमान वाटत होता, अशी प्रतिक्रिया रशियावरून सत्यजीत पाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :रशिया