Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉगिंग ट्रॅकविरोधात स्थानिकांचे धरणे

By admin | Updated: April 28, 2017 01:00 IST

जोगेश्वरी पूर्व येथील संजयनगर येथील खेळाच्या मैदानावर पालिकेकडून जॉगिंग ट्रॅक बनवण्याचे काम सुरू असून याला स्थानिक

मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील संजयनगर येथील खेळाच्या मैदानावर पालिकेकडून जॉगिंग ट्रॅक बनवण्याचे काम सुरू असून याला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. मैदान वाचवण्यासाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक नगरसेवक, महापालिका आयुक्त, पालिका साहाय्यक आयुक्त या सर्वांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते. मात्र पत्रव्यवहार करूनसुद्धा अखेर मार्ग न निघाल्यामुळे स्थानिक नागरिकांसह, तरुणांनी पालिकेच्या के पूर्व विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र विरोध दर्शवण्यासाठी जोरदार धरणे आंदोलन केले.या वेळी धरणे आंदोलनात जोगेश्वरीतील शेकडो तरुण तसेच महिला ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान के पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता शांतीलाल टांक यांनी आंदोलनकर्त्या तरुणांना निवेदन दिले. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. या धरणे आंदोलनात मैदान बचाव समिती, जनता जागृती मंच, डीवायएफआय संस्था, स्थानिक नागरिक महिलांसह तरुणांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.दरम्यान, पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक ७७ चे स्थानिक शिवसेना नगरसेवक अनंत नर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील आंदोलनकर्ते हे विरोधाला विरोध करत आहे. या ठिकाणी पूर्वी समाजकंटक आणि गर्दुल्ले बसत होते. आता पालिकेच्या माध्यमातून येथे क्रीडांगण विकसित होत आहे. क्रीडांगणाला जॉगिंग ट्रॅकचा अजिबात अडथळा नसून जॉगिंग ट्रॅक आणि मैदानाची उंची समान आहे. येथील मैदान आणि जॉगिंग ट्रॅकसंदर्भात नागरिकांची २ ते ३ वेळा बैठक झाली होती, मात्र आता विरोधाला विरोध करणे हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)