Join us

परळमध्ये जलवाहिनी फुटल्याने वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 04:30 IST

परळ टी.टी. उड्डाणपूल येथे गुरुवारी सकाळी जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले. वर्दळीच्या वेळीच येथे पाणी तुंबल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एक मार्गिका बंद ठेवण्यात आली.

मुंबई  - परळ टी.टी. उड्डाणपूल येथे गुरुवारी सकाळी जलवाहिनी फुटून हजारो लीटर पाणी वाया गेले. वर्दळीच्या वेळीच येथे पाणी तुंबल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील एक मार्गिका बंद ठेवण्यात आली. परिणामी, या मार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली. ही गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावरील वाहतूक वडाळा आणि नायगाव क्रॉस रोड मार्गे वळविण्यात आली. मात्र जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने शुक्रवारीही नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.परळ टी.टी. येथील उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वीची ४८ इंचांची ही जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून पाण्याची गळती सुरू असल्याचे काही वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांना सतर्क केले. जलवाहिनीतून हजारो लीटर पाणी वाहून जात असल्याने या उड्डाणपुलाखालील गजबजलेल्या कृष्णानगर परिसरात पाणी तुंबले. शहरांमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी हा उड्डाणपूल सोयीचा असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र पाणी तुंबल्यामुळे तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी या उड्डाणपुलाखालील डॉ. आंबेडकर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक अतिशय धिम्या गतीने होत असल्याने दादरपर्यंत वाहनांची रांग तयार झाली होती. दरम्यान, ही जलवाहिनी फुटण्यामागचे कारण आणि दुरुस्तीचा कालावधी महापालिकेने स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास उद्याचा दिवस उजाडणार आहे.वाहतुकीच्या मार्गात बदल : परळ टी.टी. दक्षिण मार्गिकेकडील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक भोईवाडा - नायगाव क्रॉस रोड मार्गे चार रस्त्याच्या दिशेने, तर एमटीएनएल आॅफिस - चार रस्ता - आर.ए. किडवाई मार्ग - छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी वाहतूक वळविण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी ट्विट केले आहे.पाणीकपात नाही : परिसरात होणाºया पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ४ ते ७ दरम्यान आहे. त्यामुळे पाण्याची समस्या या परिसरातील लोकांना जाणवणार नाही, असे जल अभियंता खात्याने स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र या मार्गावर कोणतेही काम सुरू नव्हते. त्यामुळे जलवाहिनी फुटण्यामागचे कारण महापालिकेला लगेच कळू शकले नाही. 

टॅग्स :मुंबई