कणकवली : एकेकाळी अडीच लाख गिरणी कामगारांची मान्यताप्राप्त असलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने गिरणी संपानंतर मालकधार्जिणे धोरण अवलंबून गिरणी कामगारांचे संसार उद्ध्वस्त केल्याची टीका गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष भाई चव्हाण यांनी येथे केली.कल्याणकारी संघाच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीची सभा येथील संघाच्या कार्यालयात शनिवारी झाली. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी शरद परब, काका देऊलकर, हरिष पडवळ, विलास राऊळ, दिगंबर कदम, गीता नाटेकर आदी उपस्थित होते.यावेळी चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय मिल मजदूर संघावर कामगारांचा प्रचंड रोष आहे. सत्तेवर असताना या संघाचे अध्यक्ष माजी नगरविकास राज्यमंत्री सचिन अहिर यांनी या कामगारांवर सतत अन्याय केला. तेच आता गिरण्यांचे स्थलांतर खपवून घेणार नाही अशी दांभिक भाषा करून आम्हीच तारणहार असल्याचे भासवित आहेत. संघाच्या या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आज दीड लाख गिरणी कामगारांसमोर त्यांच्या हक्काच्या मोफत घरांचा प्रश्न राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे रेंगाळला आहे. अॅड. किशोर देशपांडे यांनी १० वर्षांपूर्वी या प्रश्नाला हात घातला. त्यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेते स्वत:च्या स्वार्थासाठी गिरणी मालकांची तळी उचलून धरत होते. वास्तविक विदर्भात मुंबईच्या काही गिरण्या नेण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज त्याच विदर्भात अनेक सूतगिरण्या आजारी अथवा बंद पडल्या आहेत. ही वस्तुस्थिती ते दुर्लक्षित करीत आहेत. त्यामुळे मुंबईतील कोणतीही गिरणी कुठेच हलविली जाणार नाही. त्यामुळे या राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेते आणि त्यांचे भाट गिरणी कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत, असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)
‘त्या’ संघामुळे गिरणी कामगार उद्ध्वस्त
By admin | Updated: March 9, 2015 23:57 IST