Join us  

पावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 5:40 AM

वांद्रे-कुर्ला संकुल, नवी मुंबईची परिस्थिती जैसे-थे : मोकळा श्वास घेणे अजूनही अवघडच

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील धूर, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने धूरक्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळे, मुंबईकरांना श्वसन आणि त्वचेच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, ‘सफर’ संकेतस्थळाच्या शुक्रवारच्या अहवालानुसार, गुरुवारी पडलेल्या पावसामुळे धूलिकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेटर मॅटर) काहीसे घटले आहे. असे असले, तरी वांद्रे-कुर्ला संकुल आणि नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब असल्याचेही अहवालात नोंदविण्यात आले आहे.

आॅक्टोबर महिन्यातील वाढत्या तापमानामुळे मुंबईकर होरपळून गेले असतानाच, हवामानातील बदलानंतर गुरुवारी झालेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला. पावसामुळे वातावरणातील धूलिकणांचे प्रमाण घटले आहे. ही बाब दिलासादायक असली, तरी धूलिकण घटण्याचे प्रमाण एक किंवा दोन दिवस राहील, असे पर्यावरण अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबईकरांसाठी स्वच्छ वातावरणात मोकळा श्वास घेणे अजूनदेखील अवघडच आहे.हवेची गुणवत्ता खालावल्याची नोंदमुंबई शहर आणि उपनगरात आॅक्टोबर महिन्यात हवेची गुणवत्ता खालावल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना अ‍ॅलर्जी, सर्दी, कफ, घशाचे आजार, त्वचेवर पुरळ येणे, अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. दम, धाप लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा संपल्यानंतर साथीचे आजार आणि आॅक्टोबर हीटमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. 

पाऊस पडल्यामुळे आणि वारा वाहायला लागल्याने हवेतील पार्टिक्युलेटर मॅटर २.५ कमी झाले आहेत. मात्र, हिवाळा सुरू झाल्यावर धूलिकणांचे प्रमाण वाढणार आहे.- गुरफान बेंग, प्रकल्प संचालक, सफरपावसामुळे दोन किंवा तीन दिवस धूलिकणांचे प्रमाण घटले असेल. त्यानंतर, पुन्हा ते वाढणार आहे. तापमान वाढल्यावर पार्टिक्युलेटर मॅटर २.५ वर जाणे आवश्यक असते. मात्र, उंच इमारतीमुळे वारा वाहण्यास जागा नाही. वारा नसल्याने धूलिकण एकाच ठिकाणी साचले जातात. रस्त्याशेजारील झाडांच्या फांद्याची छाटणी केल्यामुळे धूलिकणांना स्थिरावण्यासाठी जागा उपलब्ध नाही.- डी. स्टॅलिन,प्रकल्प संचालक, वनशक्ती

टॅग्स :प्रदूषण