Join us

विकासकांच्या वादामुळे शौचालयाचे काम ठप्प

By admin | Updated: November 26, 2015 02:15 IST

वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत अनेक ठिकाणी स्वच्छ शहर करण्यासाठी बैठ्या चाळींमध्ये ेसार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली.

मुंबई : वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत अनेक ठिकाणी स्वच्छ शहर करण्यासाठी बैठ्या चाळींमध्ये ेसार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात आली. परंतु ‘वस्ती स्वच्छता’ योजनेअंतर्गत शौचालयाच्या बांधकामाला परवानगी मिळूनही गेल्या दीड वर्षापासून विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथील हनुमान नगरमधील रहिवासी शौचालयाच्या अर्धवट कामामुळे त्रस्त आहेत.कन्नमवार नगर दोन येथील हनुमान नगर ही साधारण १५० कुटुंबांची लोकवस्ती असून जुलै २०१४ मध्ये वाढत्या लोकवस्तीसाठी अधिक शौचालयांच्या बांधणीला महानगरपालिकेने योजनेअंतर्गत हिरवा कंदील दिला. कागदोपत्री सगळ्या बाबींची पूर्तता झाल्यावर येथील जुने शौचालय पाडण्यात आले. शिवाय, रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या १२ शौचालयांची उभारणी करण्यात आली. परंतु, आजच्या घडीला दीड वर्ष उलटूनही योजनेअंतर्गत असणाऱ्या शौचालयांचे काम पूर्ण झालेले नाही. तात्पुरत्या बारा शौचालयांपैकी पुरुषांचे एक आणि महिलांच्या तीन शौचालयांची दुरवस्था आहे. त्यामुळे येथील नोकरदार स्थानिकांना अपुऱ्या शौचालयांमुळे प्रात:विधीसाठी तासन्तास रांगा लावाव्या लागतात. शौचालय बांधताना पाण्याचा पुरवठा नियमित असावा, याकरिता स्थानिकांनी स्वखर्चाने या ठिकाणी पाण्याच्या टाक्या मागविल्या. पण आता हळूहळू शौचालयांच्या कामासाठी मागवलेले सामान या जागेवरून स्थानिकांशी चर्चा न करता परत नेले जात आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मनात सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. विकासकाशी तसेच महापालिका अधिकाऱ्यांशी शौचालयाच्या कामाबाबत विचारणा केली असता काम लवकरच सुरू होईल, अशी उडवाउडवीची उत्तरे मिळतात, असा स्थानिकांचा आरोप आहे. शिवाय ज्या टाकीचे काम करण्यात आले आहे ती टाकी निकृष्ट दर्जाची असून ती पावसाच्या दिवसात गळत होती, असा आरोपही येथील स्थानिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)