Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांअभावी २७ धोकादायक इमारती जैसे थे

By admin | Updated: June 11, 2015 05:46 IST

पावसाळ्यात होणाऱ्या इमारत कोसळण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींवर कारवाईचे आदेश

ठाणे : पावसाळ्यात होणाऱ्या इमारत कोसळण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील ५८ अतिधोकादायक इमारतींवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत सुमारे ३० इमारतींवर अतिक्रमण विभागाने हातोडा चालविला. परंतु मुंब्रा, कौसातील सुमारे २७ इमारतींवर पोलीस संरक्षण न मिळाल्याने अद्यापही कारवाई होऊ शकलेली नाही. येथील रहिवासी घरे खाली करण्यास तयार नाहीत. त्यामुळेच कारवाई रखडल्याची माहिती पालिकेने दिली. मागील महिन्यात आयुक्तांनी सर्व विभागांचा मान्सूनपूर्व आढावा घेतला होता. या वेळी, शहरातील अतिधोकादायक ५८ इमारतींवर ३१ मेपर्यंत कारवाई करा, असे आदेश त्यांनी अतिक्रमण विभागाला दिले होते. ३१ मेपर्यंत शहरातील केवळ १० इमारतींवर हातोडा टाकण्यात आला असून ७ इमारती या रिकाम्या करण्यात आल्या होत्या. परंतु, आता ९ जूनपर्यंत ३० अतिधोकादायक इमारतींवर कारवाई केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामध्ये मुंब्रा प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समित्यांमधील इमारतींचा समावेश आहे. येथील इमारतीमधील रहिवाशांना पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिर आणि रेंटल हाऊसिंगच्या स्कीममध्ये निवारा दिला आहे. (प्रतिनिधी)