Join us  

पेंग्विनमुळे पर्यटकांची संख्या २५ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 2:33 AM

भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क वाढविण्यात आल्याने मासिक उत्पन्न वाढले.

मुंबई : भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क वाढविण्यात आल्याने मासिक उत्पन्न वाढले. पूर्वी दोन ते पाच रुपयांपर्यंत असलेले प्रवेश शुल्क थेट शंभर रुपये करण्यात आले. तरीही पेंग्विनला पाहण्यासाठी बच्चेकंपनी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. तब्बल २५ लाख पर्यटकांनी या काळात राणीबागेला भेट दिल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत दहा कोटी रुपये उत्पन्न जमा झाले आहे.राणीच्या बागेत हॅम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन २६ जुलै २०१६ रोजी आणण्यात आले. सध्या सात पेंग्विन राणीबागेत उभारलेल्या विशेष काचघरातील तलावात विहार करीत आपल्या लीलांनी पर्यटकांना मोहित करीत आहेत. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात ९ लाख २८ हजार पर्यटक आल्याने तीन कोटी ७८ हजार रुपये उत्पन्न जमा झाले होते.मात्र एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत पर्यटकांची संख्या १२ लाख ५३ हजारांवर पोहोचली. त्यातून पाच कोटी १७ हजार रुपये तिजोरीत जमा झाले. एप्रिल २०१९ ते जून २०१९ या तीन महिन्यांत एक लाख पर्यटक आणखी वाढले. यातून दीड कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले. जुलै महिन्यात मात्र ३४ हजार ४०० पर्यटक आले. त्यातून १५ लाख ६७ हजार रुपये जमा झाले.डोनाल्ड, डेझी, आॅलिव्ह, पॉपाया, मिस्टर मोल्ट, फ्लिपर, बबल अशी पेंग्विनची नावे आहेत. सध्या पेंग्विन कक्षात डोनाल्ड-डेझी, आॅलिव्ह-पॉपॉय, मिस्टर मोल्ट-फ्लिपर या तीन जोड्या तयार झाल्या आहेत.

टॅग्स :मुंबई