Join us

पुरे झाले पाटील, कथोरे, म्हात्रे; आता कोणीही नको

By admin | Updated: December 22, 2014 22:24 IST

लोकसभा निवडणूकीपासून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये भाजपमध्ये बाहेरुन येत पद पदरात पाडून घेणा-यांची संख्या लक्षणीय आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवलीलोकसभा निवडणूकीपासून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये भाजपमध्ये बाहेरुन येत पद पदरात पाडून घेणा-यांची संख्या लक्षणीय आहे. विधानसभेतही ते दिसून आले. आधी केंद्रात आणि त्यानंतर आता राज्यात भाजपाची सत्ताही आली़ त्यामुळे जे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असे विरोधक पक्षात येण्यासाठी वाट्टेल ते असे धोरण अवलंबत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आधीच पक्षात वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते नाराज असूनही केवळ पक्षआत्मीयतेसाठी कार्यरत आहेत त्यांना आणखी नाराज करु नका, आता तरी पक्षाचे बाजारीकरण थांबवा असा सूर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.लोकसभेच्या कालावधीत ऐन निवडणुकीच्या धामधूमीत भिवंडीचे विद्यमान खासदार कपिल पाटील आले, त्यावर त्या ठिकाणी पक्षाकडे तगडा उमेदवार नव्हता असे कारण सांगितले होते़ आता तर ते निवडून आले आहेत. पक्षबांधणीसाठी ग्रामीण भागात आगामी काळात जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये त्यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. त्यानंतर विधानसभेच्या काळातही सध्याच्या आमदार मंदा म्हात्रे, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीही त्यांच्या पूर्वीच्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात तिकिट मिळवून आमदारकीही मिळवली. तेव्हाही निष्ठेने काम केले तरी उपेक्षा झालेल्या कार्यकर्त्यांनी शांतता - संयम बाळगला. मात्र आता मात्र नवी मुंबईत जे राजकारण सुरु आहे त्याला पक्षातून प्रचंड विरोध होत असून ज्यांना पक्षात यायचे त्यांनी जरुर यावे, पण कोणत्याही पदाची अपेक्षा बाळगू नये, अन्यथा पक्षात नाराजी पसरेल असा इशारा ठाणे, कल्याण,डोंबिवली, नवी मुंबई आदी सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी-आमदारांना दिला आहे. कोणी काहीही आमिषे दाखवू देत, पण आता पक्षामध्ये चांगले वातावरण असून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे कोणालाही घ्यायची गरज नाही असे त्यांनी सुनावले आहे.