नवी मुंबई : रविवारच्या मेगाब्लॉकचा फटका पोस्ट विभागातील एमटीएस परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. हार्बर मार्गावर लोकल वेळेत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. विद्यार्थ्यांनी विनंती करूनही केंद्रप्रमुखांनी परीक्षेला बसू न दिल्यामुळे अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोस्ट विभागातील मल्टी टास्किंग स्टाफच्या थेट भरतीसाठी (एमटीएस) महाराष्ट्र विभागासाठीची परीक्षा रविवारी घेण्यात आली. मुंबई विभागासाठी नेरूळमधील तेरणा डेंटल महाविद्यालयामध्ये केंद्र ठेवण्यात आले होते. परंतु मेगाब्लॉक असल्यामुळे अनेक विद्यार्थी साडेदहा वाजता परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहचू शकले नाहीत. परळ व इतर ठिकाणी राहणारे विद्यार्थी कुर्ला व तेथून वाशीपर्यंत आले. पुढे लोकल वेळेवर नसल्यामुळे रिक्षा करून परीक्षा केंद्रावर पोहचले. परंतु तेथील केंद्रप्रमुखांनी ११ वाजेनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना केंद्रावरून परत जावे लागले. आम्हाला जादा वेळ देऊ नका, परीक्षेला बसू द्या, अशी विनंती करूनही काही उपयोग झाला नाही. अनेक विद्यार्थी पेपर संपेपर्यंत केंद्रावर बसून होते तर काही जण निराश होऊन परत फिरले. परळमधून आलेल्या प्रशांत गुरवने सांगितले की, परीक्षेसाठी अभ्यास केला होता. दहा वाजेपर्यंत केंद्रावर पोहचता येईल अशापद्धतीने घरातून निघालो होतो. परंतु लोकल वेळेवर मिळाली नाही. वाशीपर्यंतवेळेत आलो पण नेरूळसाठी वेळेवर गाडी मिळेना. त्यामुळे वाशीतून रिक्षा केली. येथील परीक्षकांना आम्ही खूप विनंती केली परंतु परीक्षेला बसू दिले नाही. परीक्षेसाठी आम्ही केलेला अभ्यास फुकट गेला आहे. (प्रतिनिधी)
मेगाब्लॉकमुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
By admin | Updated: May 3, 2015 23:27 IST