ठाणे : मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानच्या खारीगाव फाटकाचा अडसर दूर करण्यासाठी रविवारच्या मेगाब्लॉकमुळे दिवा स्थानकात लोकलकोंडी होऊन प्रवासी बेहाल झाले. मुंबईला जाणाऱ्या लोकल, मेल-एक्स्प्रेस दिव्यापासून जलद मार्गावर वळवण्याचे नियोजन फसल्याने ही कोंडी वाढत गेली आणि डोंबिवली ते ठाणे प्रवासाला तब्बल दोन तास लागले. दिव्यातील फाटक वारंवार खुले करावे लागल्याने या कोंडीत भर पडली. त्यात कोकण रेल्वेच्या गाड्यांनी मार्ग अडवला. मुलुंड-ठाण्यात धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवली, तर ठाण्यात पाचव्या-सहाव्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर येताना लोकलचा मार्ग अडला. याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला. मुंबईहून येणाऱ्या गाड्या मुलुंड-ठाण्यापासून जलद मार्गावर वळवल्या होत्या. त्यांना ठाण्यानंतर दिवा-डोंबिवलीचा थांबा होता. पण काही गाड्या दिव्याहून धीम्या मार्गावर वळवल्या जात होत्या. मात्र मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या जलद, तर काही धीम्या मार्गावर वळवल्या. धीम्या गाड्या दिव्यात पुन्हा जलद मार्गावर वळवल्या. धीम्या-जलदचा मार्गबदल, कोकण रेल्वेचा मार्गबदल, रेल्वे क्रॉसिंग यामुळे दिव्यात कोंडी झाली. एकापाठोपाठ पाच-सहा गाड्या उभ्या होत्या. त्यामुळे कंटाळून प्रवाशांनी रूळांत उड्या टाकून दिवा गाठले. रविवार असल्याने कुटुंबासह बाहेर पडलेल्यांचे हाल झाले. गाड्या खोळंबल्याने ठाणे-डोंबिवली आणि कल्याणला स्थानकांत, पुलांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. मेगाब्लॉकच्या घोषणा होत नसल्याने गोंधळात भर पडली. खारीगाव येथील ६५० मी. रूंदीच्या रोड ओव्हरब्रीजसाठी स्टीलचे सहा गर्डर टाकण्याचे काम असल्याने ठाणे ते दिवा दोन्ही मार्ग पाच तास बंद होते. (प्रतिनिधी)
रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रवासी बेहाल
By admin | Updated: January 9, 2017 06:53 IST