ठाणे : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून वाढलेला उकाडा व दमट हवामान आणि त्यात कडक ऊन नकोसे असतानाच शनिवारी पहाटे ६ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यास झोडपले. महिन्याचा दुसरा शनिवार असल्यामुळे सरकारी कार्यालये, अधिकारी-कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला नसला तरी विद्यार्थ्यांना मात्र शाळेत जाण्यास विलंब झाला. जिल्हाभरात सुमारे सरासरी १० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. १५ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने ७१० हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असताना आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून भाजीपाला, आंबा बागांसह वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ यात सर्वाधिक २००० एकर मिरची पिकाचा समावेश आहे़ठाण्यासह कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, शहापूर, मुरबाड या सर्व तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडला. यादरम्यान जिल्ह्यातील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे काही अंशी उकाडा कमी जाणवत असला तरी नागरिकांसह ग्रामस्थांना विविध नुकसानीला तोंड द्यावे लागले. इमारतीच्या गच्चीवर वाळण्यासाठी टाकलेले कुरडया, पापड, शेवाया, करोडे आदी खाद्यपदार्थ मात्र या पावसामुळे ओले झाले. तर गावपाड्यांमध्ये बाहेर झोपलेल्यांची चांगलीच पळापळ झाली. याशिवाय, कळव्यासह अन्य ठिकाणी काही किरकोळ आगीच्या घटना यादरम्यान घडल्या असता ठाणे महापालिका अग्निशमन दलाने त्या वेळीच आटोक्यात आणल्याचा दावा केला जात आहे.शिरोशी : सतत पडत असलेल्या अवकाळी पावसाने मुरबाडकरांच्या नाकीनऊ आणले आहे. तालुक्यात सध्या लग्नसराई सुरू असून त्यात समस्या उद्भवत आहेत. अवकाळी पावसामुळे हळदी, लग्न समारंभांत अडथळे येत आहेत. मार्च महिन्याच्या ४, ७, ९, १०, १२ आणि १७ या तारखांना बहुतेक ठिकाणी विवाह समारंभ आहेत. यादरम्यानच्या कालावधीत मंगल कार्यालयात लग्न केल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे लग्नाच्या खर्चात या पावसामुळे वाढ होत आहे.पहाटे अवकाळी पावसाची हजेरीअंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना शनिवारी पहाटे अवकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक नाले भरून वाहत असल्याने हे पाणी रस्त्यावर आले होते. शाळा आणि नोकरीवर निघालेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. भुयारी गटारांसाठी रस्ते खोदण्यात आल्याने या रस्त्यांवर पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. चिखलात अनेक दुचाकीस्वारांच्या गाड्या सटकण्याचे प्रकार घडले. सकाळी ७ वाजता पावसाने विश्रांती घेतली. अवकाळी पावसाने शहापूर तालुक्याला तिसऱ्यांदा झोडपले शहापूर : गेल्या दोन महिन्यांत अवकाळी पावसाने शहापूर तालुक्याला तिसऱ्यांदा झोडपून काढले आहे. शनिवारी पहाटे ५.३० वाजता शहापूर, वासिंद, अघई, खर्डी, कसारा, किन्हवली, डोळखांब, भातसानगर, शेणवा या भागांतील गावांना तुफान गारपिटीसह आलेल्या पावसाने झोडपून काढले. अवकाळी पावसाच्या फटक्यामुळे काजू, फणस, चिकू व रायवळ आंब्यांचा मोहोर गळून गेला आहे. गवार, मिरची, चवळी व येथून परदेशांत निर्यात होणाऱ्या भेंडीचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीट व सततच्या पावसाला कंटाळून असंख्य वीटभट्टी उत्पादकांना यंदा अर्ध्यावरच व्यवसायाचा गाशा गुंडाळावा लागला आहे. दुबार भातशेतीचेही नुकसान झाले असून सरकारी मदत अद्यापि न मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शनिवारी पहाटे झालेल्या गारपिटीचा जोरदार फटका वेळूक, वाशाळा, माळ, डेहेणे, बेलवली, खंडुचीवाडी, खोस्ते, साखरोली, टहारपूर, नेवरे, खोर, वांद्रे येथील घरांनादेखील बसला असून रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून साथीचे आजार बळावले आहेत. कावीळ, सर्दी, खोकला, तापाच्या रु ग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.