Join us
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तींच्या उंचीवर आलेल्या मर्यादेमुळे कंठी व हिऱ्यांची सजावट करणाऱ्या कलाकारांचा व्यवसाय मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:09 IST

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जावा यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली. या नियमावलीमध्ये घरगुती व ...

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जावा यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली. या नियमावलीमध्ये घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी उंचीची मर्यादा घालण्यात आली. यामुळे गणेशमूर्तींची सजावट करणाऱ्या कलाकारांचा व्यवसाय मात्र मंदावला. छोट्या मूर्तींची सजावट करावी लागत असल्यामुळे उत्पन्नातदेखील घट झाली. त्याचप्रमाणे मूर्तीच्या प्रत्येक फुटामागे दर आकारले जात असल्याने कमाईवर मोठ्या प्रमाणात बंधने आली. अनेक कलाकारांना यंदा ७० ते ८० टक्के नुकसान सहन करावे लागले आहे.

मागील काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाचे रूप बदलत गेल्याने आता भाविकांच्या गणेशमूर्तीबाबत असणाऱ्या आवडीनिवडीदेखील बदलत गेल्या. आता मूर्तिकारांच्या चित्रशाळांत जाऊन फक्त गणेशमूर्तीच घरी आणली जात नाही तर त्यासोबत विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य, आकर्षक रोशणाई या गोष्टीदेखील उत्सव साजरा करण्यासाठी भाविकांच्या पसंतीस उतरत आहेत.

गणेशमूर्तीसोबत कंठी, मुकुट तसेच गणपतीला विविध प्रकारचे दागिने, त्यावर हिरे-मोत्यांची सजावट, गणपतीला धोतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीनिवडी प्रत्येक भाविकाच्या असतात. यामुळे मागील काही वर्षांमध्ये गणपतीची सजावट करणाऱ्या कलाकारांनादेखील व्यवसाय प्राप्त झाला. या कलाकारांना विविध चित्रशाळांमधून तसेच मंडळांमधून बोलावले जाऊ लागले.

सागर थवई - कोरोनामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक मंडळांनी सलग दोन वर्षे वर्गणीदेखील गोळा केली नाही. त्यामुळे गणेशोत्सवात होणारा अतिरिक्त खर्च सर्व जण टाळत आहेत. गणेशमूर्ती सजविण्यासाठी यंदा फार कमी लोक पुढाकार घेत आहेत. तर काही जण कमी बजेटमध्ये मूर्ती सजवून घेत आहेत. त्यात बाजारात साहित्यदेखील महाग झाले आहे. याचा एकूणच परिणाम आमच्या व्यवसायावर झाला आहे.