दीपक मोहिते, वसईविरार शहराच्या पश्चिमेकडील प्रभाग क्र. २३ मध्ये गेल्या १० वर्षांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणांवर ताण पडत गेला. प्रभागातील ८० टक्के विकासकामे तत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकालात पूर्ण झाली. रस्ते, गटारे, समाजमंदिर, महिलांसाठी शौचालय तसेच उद्यानाचा त्यात समावेश आहे. सध्या या प्रभागामध्ये भूमिगत गटारांचे काम सुरू असून लवकरात लवकर ते पूर्ण होईल. त्यामुळे सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या प्रभागात पाण्याची समस्या असून वाढत्या लोकसंख्येच्या या प्रभागाला सध्या मिळणारे पाणी अपुरे आहे. तसेच दैनंदिन साफसफाईचे काम ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य पद्धतीने होत नसल्याने प्रभागातील नागरिकांच्या विशेषकरून महिलांच्या याबाबत अनेक तक्रारी आहेत. प्रभागात जमा होणारा कचरा वेळोवेळी उचलला जाणे गरजेचे आहे. परंतु, कर्मचारीवर्ग कमी असल्यामुळे ही कामे प्रभावीरीत्या होत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. पुष्पानगर येथे नवीन समाजमंदिर बांधण्याचे प्रयत्न नगरसेविका देसाई यांनी केले होते. परंतु, सध्याच्या समाजमंदिराच्या बांधकामाला लागून नागरिकांची घरे असल्याने ती तोडणे शक्य होत नाही. त्यामुळे आहे त्याच समाजमंदिराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणीही झाली.
विकासकामे मार्गी, तरीही पाणीटंचाई कायम
By admin | Updated: January 28, 2015 23:15 IST