Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या निधनामुळे महिला आरोपीची जामिनावर मुक्तता

By admin | Updated: May 11, 2015 02:17 IST

मातृदिन साजरा होत असताना चोरीच्या आरोपाखाली भायखळा तुरुंगात बंदिस्त असलेल्या एका महिला आरोपीची चार महिन्यांची मुलगी आजाराने भाभा रुग्णालयात मृत्युमुखी पडण्याची घटना रविवारी घडली.

मुंबई : मातृदिन साजरा होत असताना चोरीच्या आरोपाखाली भायखळा तुरुंगात बंदिस्त असलेल्या एका महिला आरोपीची चार महिन्यांची मुलगी आजाराने भाभा रुग्णालयात मृत्युमुखी पडण्याची घटना रविवारी घडली. ही घटना ऐकून व्यथित झालेल्या अ‍ॅड. महेश वासवानी आणि अ‍ॅड. महंमद युसुफ यांनी अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेत या महिलेची त्वरित जामिनावर सुटका होण्याचा आदेश मिळवला.५ एप्रिल रोजी रूमा सकट (२४) आणि तिची चुलत बहीण आराधना उपाध्ये (२0) यांना बीकेसी पोलिसांनी एका जाहीर कार्यक्रमाच्या ठिकाणी १२ हजार रुपये किमतीची केबल चोरी केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. दोन्ही महिला आरोपींची त्याच दिवशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. रोजंदारीचे काम करणाऱ्या या महिला आरोपींकडे वकिलांच्या फीसाठी पैसे नसल्याने त्या न्यायालयीन कोठडीतच होत्या. रूमा सकटची घरी असलेली चार महिन्यांची मुलगी आजारी होती. आज दुपारी भाभा रुग्णालयात उपचार घेत असताना तिचे निधन झाले. ही घटना काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी अ‍ॅड. महेश वासवानी आणि अ‍ॅड. महंमद युसुफ यांच्या कानावर घातली. या वकीलद्वयीने रविवारी सुटीचा दिवस असल्याने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एन.बी. शिंदे यांच्या हाजीअली येथील निवासस्थानी धाव घेत त्यांना अर्जाद्वारे आरोपीच्या मुलीचे निधन झाल्याने तिची त्वरित तुरुंगातून सुटका करण्याची विनंती केली. बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुंडलिक निगडे यांनीही निरीक्षक विश्वनाथ शेलार आणि उपनिरीक्षक अशोक शेंडगे यांना जामीन देण्यासाठी पोलिसांची हरकत नसल्याचे न्यायालयाला कळवण्यासाठी पाठवले. न्यायालयाने दोघा वकिलांची विनंती मान्य करून प्रत्येकी २ हजारांच्या रोख जामिनावर दोघींची सुटका करण्याचे आदेश दिले. तिही रक्कम दोन्ही आरोपींकडे नसल्याने वकिलांनीच ती रक्कम भरली. सुटीच्या दिवशी आरोपी जामिनावर सुटका होत नसल्याने वकिलांनी ती बाब दंडाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून मुलीच्या अंत्यदर्शनासाठी हजर राहता यावे यासाठी तातडीने सुटका करण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाला करण्याची विनंती केली. त्यानुसार वकील आणि पोलीस अधिकारी तुरुंग कार्यालयात गेले आणि रात्री पावणेनऊ वाजता दोन्ही आरोपींची सुटका करण्यात आली. (प्रतिनिधी)