जमीर काझी, मुंबईक्रिकेटसोबत मनोरंजनाचा तडका देणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेची रंगत वाढत चालली असताना त्याच्या बंदोबस्तासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून लादल्या जाणाऱ्या सक्तीच्या ड्युटीमुळे के्रन चालक (टोइंग) रडकुंडीला आलेले आहेत. या सामन्यासाठी स्टेडियमच्या परिसरातील वाहने दूर करण्यासाठी या क्रेनचा दिवसभर वापर केला जात आहे. त्या बदल्यात संयोजकाकडून लाखोचे भाडे पोलिसांना मिळत असले तरी ‘टोइंग’वाल्यांना दमडी न देता फुकट बारा ते तेरा तास राबविले जात आहे. त्याला विरोध केल्यास क्रेन बंद करण्याची भीती दाखविली जात असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. या वर्षी आयपीएलचे अकरा सामने मुंबईतील वानखेडे आणि बेब्रॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत सात सामने झालेले आहेत. सामन्याच्या दिवशी स्टेडियमच्या परिसरातील पार्किंग आणि वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी आयोजकांकडून खासगी क्रेनबरोबरच वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने १० क्रेन मागविल्या जातात. सकाळी दहा वाजल्यापासून सामना संपल्यानंतर एक तास त्यांना स्टेडियमच्या बाहेर ठेवून घेतले जाते. एरव्ही शहर व उपनगरातील विविध चौकीच्या हद्दीत नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाईसाठी वापर केला गेल्यास, एका टु-व्हीलरमागे १०० तर फोर-व्हीलरच्या बदल्यात २०० रुपये मिळतात. मात्र आयपीएल सामन्याच्या बंदोबस्ताच्या ठिकाणी त्याचा वापर केवळ वाहने हलविण्यासाठी केला जात आहे. त्याबदल्यात वाहतूक विभागाला आयोजकांकडून दिवसागणिक लाखो रुपये देण्यात येतात, मात्र त्या ठिकाणी ड्युटीला बोलाविण्यात आलेल्या टोइंगवाल्यांना काहीही दिले जात नाही. उलट चालकासह दोन कर्मचाऱ्यांचा पगार आणि डिझेलचा खर्च त्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे हे के्रन चालक वैतागले आहेत.आयुक्तांच्या कारवाईनंतरही गैरव्यवहार सुरूचच्मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या भ्रष्ट कारभारामुळे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी नुकत्याच वरिष्ठ निरीक्षकासह तब्बल ३४ अधिकाऱ्यांच्या साइड ब्रॅँचला बदल्या केल्या आहेत. मात्र अद्यापही ट्रॅफिकचा ‘कलेक्शन’चा कारभार सुरूच आहे. क्रेन चालकाकडून हप्ते ठरवून घेतलेले आहेत. एका वाहनाचे १०० रुपये त्यांना मिळत असले तरी त्यातील ६० रुपये ट्रॅफिकच्या शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले.च्ट्रॅफिकच्या शहर व उपनगरात एकूण ४० चौकी आहेत. नो-पार्किंग व नियमबाह्य वाहनावर कारवाईसाठी ६० के्रन वापरल्या जातात. आयपीएलच्या सामन्यादिवशी दक्षिण व मध्य विभागातील कोणत्याही १० क्रेन स्टेडियमच्या परिसरात मागविल्या जातात. वाहतूक नियंत्रण कक्षाकडून क्रेनच्या मालकाला रात्री कळविले जाते.
सक्तीच्या ड्युटीमुळे टोइंगचालक हैराण
By admin | Updated: May 6, 2015 02:10 IST