मुंबई : आॅक्टोबर महिन्यापासून मुंबईत फैलावत असलेला डेंग्यू डिसेंबरच्या थंडीमुळे आता कमी झाला आहे. मुंबईत पडलेल्या थंडीमुळे साथींच्या आजार आता आटोक्यात आले असून तिसऱ्या आठवड्यात डेंग्यूचे ८ रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे १४६ रुग्ण आढळून आले होते. नोव्हेंबर महिना सुरू होऊनही थंडी न पडल्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होतच होती. पण, डिसेंबर महिन्यात पडलेल्या थंडीचा परिणाम आता दिसू लागला आहे. डिसेंबरमध्ये जास्तीत जास्त ५७ डेंग्यूचे रुग्ण आढळून येतील असा तज्ज्ञांचा अंदाज होता. पहिल्या तीन आठवड्यांमध्ये डेंग्यूचे चाळीसच रुग्ण आढळले आहेत. पुढच्या आठवड्यातही थंडी कायम राहणार असल्यामुळे पुढच्या आठवड्यात अजून कमी डेंग्यूचे रुग्ण आढळतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डेंग्यूच्या बरोबरीनेच मलेरियाच्या प्रमाणातही घट झालेली दिसून आली आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मलेरियाचे १५७ रुग्ण आढळले होते, तर तिसऱ्या आठवड्यात १०९ रुग्ण आढळून आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात मलेरियाचे रुग्ण अर्ध्यावर आले आहेत. तापाच्या रुग्णांमध्येही घट झाली आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात १ हजार २२५ रुग्ण आढळले आहेत. गॅस्ट्रोचे १७८, टायफॉइडचे १६, हीपॅटायटिसचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. डिसेंबर २०१३ च्या तुलनेत या डिसेंबरमध्ये आढळून आलेल्या रुग्णांची संख्या अर्ध्यावर आलेली आहे. (प्रतिनिधी)
थंडीमुळे साथींचे आजार झाले कमी
By admin | Updated: December 24, 2014 01:09 IST