Join us
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ क्षेत्रातील बाराबलुतेदारांना दिलासा

By admin | Updated: May 28, 2014 01:07 IST

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या त्या दहा गावांतील बाराबलुतेदारांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे

नवी मुंबई : प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या त्या दहा गावांतील बाराबलुतेदारांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. याअंतर्गत या गावांतील बाराबलुतेदारांचे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वेक्षणाच्या या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. विमानतळामुळे प्रभावित होणार्‍या दहा गावांत सुमारे ३00 ग्राम कारागीर आहेत. हे सर्वच बाराबलुतेदारांमध्ये मोडतात. त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, लघुउद्योग स्थापन करून बँकांमार्फत त्यांना कर्ज मिळवून देणे आदी प्रक्रिया सोयीची व्हावी, यासाठी हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विमानतळ क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी सिडकोने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गतच बाराबलुतेदारांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्याचा सिडकोचा उद्देश आहे. या बैठकीला सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा, प्रधान सचिव (नगरविकास-१) मनुकुमार श्रीवास्तव, महापालिका आयुक्त आबासाहेब जºहाड, संचालक नामदेव भगत उपस्थित होते. (प्रतिनिधी)