डोंबिवली : ठाकुर्ली येथील ललिता पाटील (५५) मेडिकलमधून औषधे आणण्यासाठी जात असताना त्यांच्या पाठीवर दोन इसमांनी दुचाकीवरून येऊन थाप मारली. ही थाप त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचण्यासाठी मारल्याचे लक्षात येताच त्यांनी जोराने ओरडण्यास सुरुवात केली. त्यावर, परिसरातील तिघा पुरुषांनी तातडीने त्या दोघांना गाडीवरून खाली पाडले. हे अट्टल चेन स्नॅचर असून त्यांना रामनगर पोलिसांच्या हवाली केले आहे.तौफिक तेजीब हुसेन (२५), रा. इंदिरानगर, वाल्मीकी शाळेजवळ, आंबिवली आणि गुलामअली सरताज जाफरी (३२), भास्कर शाळेच्या मागील चाळीत, पाटीलनगर, आंबिवली अशी त्या अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात पाठविल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी सांगितले. ही घटना शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोघांवरही दरोड्याचा प्रयत्न, चोरीचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगणे, त्याचा वापर ठार मारण्याच्या उद्देशाने करणे, अशी कलमे लावण्यात आल्याचेही शिवरकर म्हणाले.
महिलेच्या सतर्कतेमुळे दोन अट्टल चेन स्रॅचर गजाआड!
By admin | Updated: May 9, 2015 23:03 IST