नवी मुंबई : साठेबाजांविरोधातील धाडसत्रामुळे व इजिप्तवरून आलेल्या कांद्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. सोमवारी तब्बल १४२ वाहनांमधून १,४४५ टन कांद्याची आवक झाली आहे. परंतु आवक वाढली तरी बाजारभाव कमी झालेले नाहीत. आॅगस्टच्या सुरवातीपासून देशभर कांदाटंचाई सुरू झाली आहे. सर्वच बाजारपेठांमधील आवक घटली होती. मुंबईमध्ये रोज १०० ते १२५ वाहनांमधून ९०० ते १ हजार टन कांद्याची आवक होते. परंतु गेल्या आठवड्यात ४०० ते ६०० टन कांद्याची आवक होत होती. दोन दिवसांपूर्वी इजिप्तवरून ८४ टन कांद्याची आवक झाली. सरकारने नाशिक व इतर ठिकाणी साठेबाजांवर धाडसत्र सुरू केले. यामुळे सोमवारी मुंबईमधील कांद्याची आवक वाढली आहे. तब्बल १०५ ट्रक व ३७ टेम्पोमधून तब्बल १४४५ टन कांद्याची आवक झाली आहे. मागील दोन महिन्यांत ही सर्वाधिक आवक आहे. परंतु आवक वाढली तरी होलसेल मार्र्केटमध्ये कांदा ५१ ते ६१ रुपये दरानेच विकला जात होता. किरकोळ मार्केटमध्येही ७० रुपयाने कांद्याची विक्री सुरू होती. आवक अशीच राहिली तर पुढील काही दिवसांमध्ये भाव कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
धाडसत्रामुळे कांद्याची आवक वाढली
By admin | Updated: August 25, 2015 03:12 IST