पनवेल : पाणीटंचाई आणि दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ हे अभियान हाती घेतले आहे. त्याचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत माथेरानच्या पायथ्याशी असलेले मालडुंगे आणि धोदाणी गावातील शिवार जलयुक्त होणार आहे.राज्यात पुरेसा पाऊस न पडल्याने अनेक गावात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर ओलिताखालील जमिनीचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. शेतीला पाणी नसल्याने उत्पन्न नाही याच कारणामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्यांचे प्रमाण वाढले. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने पाणी अडवा... पाणी जिरवा मोहिमेच्या धर्तीवर जलयुक्त शिवार हे अभियान हाती घेऊन ते प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरूवात पनवेलपासून होत आहे. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याकडे प्रांताधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार पवन चांडक आणि मंडळ अधिकारी महेश भाट यांनी मालडुंगे आणि धोदाणी गावाची याकरिता शिफारस केली.त्याचबरोबर सुवर्ण राजस्व अभियानांतर्गत भांगे यांनी मागील वर्षी धोदाणीला भेट देऊन या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचे अवलोकन केले होते, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानाकरिता या गावांची निवड करीत तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. (वार्ताहर)
धोदाणीचे कोरडे शिवार आता पाण्याने व्यापणार...
By admin | Updated: January 25, 2015 22:36 IST