Join us

बोरिवली रेल्वे स्थानकावर पकडले ७५ लाखांचे अंमली पदार्थ; दोघांना अटक, एनसीबीची कारवाई

By मनोज गडनीस | Updated: May 2, 2024 20:08 IST

अंमली पदार्थांचा व्यवहार करणारी एक आंतरराज्यीय टोळी मुंबईतून सक्रिय होती.

मुंबई - रेल्वेद्वारे अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीला नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी बोरिवली रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी एका व्यक्तीला माहिम येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे ७५ लाख रुपये मूल्याचे अंमलीपदार्थ सापडले.एनसीबीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा व्यवहार करणारी एक आंतरराज्यीय टोळी मुंबईतून सक्रिय होती.

त्या संदर्भात विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या टोळीतील एल जी खान या व्यक्तीवर पाळत ठेवली होती. तो बोरिवलीला रेल्वेतून अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला बोरिवली रेल्वे स्थानकात ताब्यात घेत त्याच्या सामनाची तपासणी केली असता त्याच्याकडे अंमली पदार्थ आढळून आले.

हे अंमली पदार्थ माहिम येथे राहणाऱ्या यू यू खान या व्यक्तीने आपल्याला दिल्याची माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी यू यू खान याच्य घरावर छापेमारी करत त्यालाही अटक केली. विशेष म्हणजे, यू यू खान याच्याविरोधात अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे यापूर्वी देखील झाले आहेत आणि सध्या तो अशाच एका प्रकरणात जामिनावर बाहेर होता.

टॅग्स :अमली पदार्थबोरिवली