महापालिकेचे प्रतिज्ञापत्र
मुंबई : महापालिका रुग्णालयातील औषधे खरेदीत घोटाळा झालेला नाही व मुदत संपलेली औषधेही वापरली गेली नसल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र सार्वजनिक रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ़ विद्या ठाकूर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात सादर केल़े
पालिकेच्या रुग्णालयात मुदत संपलेली औषधे वापरली जात असून, याने काही रुग्णांचा बळी गेला आह़े तेव्हा याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केली आह़े या याचिकेवर न्या़ पी़ व्ही़ हरदास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात हे प्रतिज्ञापत्र सादर केल़े मुदत संपलेल्या इंजेक्शनचा वापर बंद करावा व त्याचा साठाही टाकून द्यावा, असेही रुग्णालयांना सांगितल्याचे प्रतिज्ञापत्रत नमूद केले आह़े मात्र अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानुसार मुदत संपलेली औषधे वापरली गेली आहेत, असा दावा तिरोडकर यांनी केला़ त्यावर या अहवालाची प्रत सादर करण्याचे आदेश देत न्यायालयाने सुनावणी दोन आठवडय़ांसाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी)