Join us  

Aryan Khan Drug Case: माझ्या व्हॉट्सॲप चॅटचा चुकीचा अर्थ लावला जातोय; आर्यन खानचा जामीन अर्जात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 7:58 AM

Aryan Khan Drug Case: आर्यन खान हा सध्या कारागृहात आहे. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यावर आर्यन खानने बुधवारी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. उच्च न्यायालयाने त्याच्या अर्जावरील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आपल्याला गोवण्यासाठी एनसीबी आपल्या व्हॉट्सॲपचा चुकीचा अर्थ लावत आहे, असे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जात म्हटले आहे. आर्यन खान हा सध्या कारागृहात आहे. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यावर आर्यन खानने बुधवारी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. उच्च न्यायालयाने त्याच्या अर्जावरील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.एनसीबी व्हॉट्स चॅटचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावत आहे. एनसीबीने छापा मारल्यावर माझ्याकडून कोणताही अमली पदार्थ जप्त करण्यात आला नाही. या प्रकरणातील आरोपी अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांच्याशिवाय माझे अन्य कोणत्याही आरोपीशी संबंध नाहीत, असे आर्यन खानने जामीन अर्जात म्हटले आहे. क्रूझ ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. एखादी व्यक्ती प्रभावशाली घरातील असेल तर ती व्यक्ती पुराव्यांशी छेडछाड करील, असे गृहीतक कायद्यात नाही, असेही आर्यन याने उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जात  म्हटले आहे.सध्या आर्यन न्यायालयीन कोठडीत आहे. क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचा दावा एनसीबीने विशेष न्यायालयात केला होता. तसेच अरबाज मर्चंटकडे अमली पदार्थ असल्याचे आर्यनला माहिती होते, असेही एनसीबीने न्यायालयाला सांगितले. मात्र त्याच्याकडे अमली पदार्थ सापडलेले नाही. त्यामुळे मला जामीन मंजूर करावा, अशी मागणी आर्यनच्यावतीने विशेष न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने एनसीबीचे म्हणणे ग्राह्य धरत आर्यनचा जामीन फेटाळला. त्याविरोधात आर्यनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

टॅग्स :आर्यन खानअमली पदार्थ