नवी मुंबई : विविध विभागांत बांधलेल्या गृहप्रकल्पात शिल्लक राहिलेल्या घरांच्या सोडत एप्रिल महिन्यात काढण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केला आहे. खारघर येथील वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उलवे येथील उन्नती प्रकल्पात जवळपास २७२ सदनिका शिल्लक आहेत. विविध संवर्गातील आरक्षणानुसारच या सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोने २००८ मध्ये खारघर सेक्टर-१६ आणि १७ मध्ये वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहप्रकल्पातील २१४४ घरांची सोडत काढली होती. विविध आर्थिक घटकांना समोर ठेवून हा गृहप्रकल्प साकारण्यात आला होता. यात केएच-१, केएच-२, केएच-३ आणि केएच-४ टाईपच्या घरांचा समावेश होता. यातील विविध टाईपच्या १९३ सदनिका विक्री न झाल्याने पडून आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या या सदनिका सोडत काढून पुन्हा विकण्याचा निर्णय सिडकोने घेतला. त्याचप्रमाणे उन्नती प्रकल्पातील ७९ घरेही विक्रीसाठी काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या शिल्लक घरांच्या किमती सध्याच्या दरानुसार असणार आहेत. विशेष म्हणजे सिडकोने उभारलेल्या विविध गृहप्रकल्पातील शिल्लक घरांची सोडत काढण्यासाठी संचालक मंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. मात्र विविध कारणांमुळे ही सोडत रखडली होती. असे असले तरी आता या सोडतीसाठी सिडकोकडून एप्रिल महिन्याचा मुहूर्त शोधला जात असल्याची माहिती सूत्राने दिली. (प्रतिनिधी)घरांचा तपशीलया सोडतीत सर्वसामान्यांसाठी केएच-३ प्रकारातील ४२ तर केएच-४ प्रकारातील ७८ घरे उपलब्ध होतील. अनुसूचित जातीसाठी केएच-३ मधील ५ तर केएच ४ मधील १५ घरे, अ. जमातीसाठी केएच-३ मधील १० तर केएच-४ मधील १७, भ.ज.साठी केएच-३ मधील ३ तर केएच-४ मधील १, वि.ज. साठी केएच-३ - १ तर केएच-४ मधील २, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केएच-३ मधील ५ तर केएच-४ मधील ८ घरे तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी केएच-३ मधील २ तर केएच-४ मधील ४ सदनिका उपलब्ध होतील.
शिल्लक घरांची सोडत एप्रिलमध्ये?
By admin | Updated: March 25, 2015 01:08 IST