Join us

अधिकृत बसथांब्यांना चालकांची हुलकावणी

By admin | Updated: March 9, 2015 22:42 IST

वाहन चालकांचा प्रवास सुखकर व्हावा व महामार्गावरील वाहतूक कोंडी रोखावी याकरिता सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले, तसेच प्रत्येक थांब्यावर प्रशस्त बसथांबा उभारून

वैभव गायकर, पनवेलवाहन चालकांचा प्रवास सुखकर व्हावा व महामार्गावरील वाहतूक कोंडी रोखावी याकरिता सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले, तसेच प्रत्येक थांब्यावर प्रशस्त बसथांबा उभारून बस उभी करण्यासाठी महामार्गालगत जागाही उपलब्ध करून दिली, मात्र बस थांबविण्यासाठी जागा उपलब्ध असूनही बसचालक महामार्गावरच गाडी उभी करून वाहतूक नियमांची पायमल्ली करीत असून यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.सायन-पनवेल महामार्गावरून एसटी, एनएमएमटी, बेस्ट, खोपोली नगरपरिषदेसह शिवनेरी तसेच अनेक खाजगी प्रवासी गाड्या मोठ्या संख्येने ये- जा करतात. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होवू नये म्हणून रस्त्यांच्या कडेला स्वतंत्र बस थांबे उभारूनही बसचालक त्या ठिकाणी थांबत नसल्यामुळे प्रवाशांचाही जीव धोक्यात येत आहे. बसच्या मागून येणाऱ्या गाड्यांनाही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. बसचालकांच्या या आडमुठ्या धोरणामुळे अनेक वाहन चालक त्रस्त झाले आहे. यामुळे अनेकदा बसचालक आणि इतर वाहनचालकांमध्ये वादही होतात. खारघर रेल्वे स्थानकाजवळील बस थांब्याजवळ प्रत्यक्ष प्रकार पाहिल्यावर बस थांब्याजवळ जागा उपलब्ध असूनही बस चालक महामार्गावरच गाड्या उभ्या करीत होते. बस चालकांच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल पनवेल एसटी आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र परदेशी यांना विचारले असता त्यांनी हा विषय गंभीर असल्याचे सांगितले, तसेच पुढील बैठकीत सर्व बस चालकांना यासंदर्भात सूचना देण्यात येतील, असे ते म्हणाले.