मुलीच्या लग्नासाठी चालकानेच केले मालकाच्या मुलांचे अपहरण
एक कोटीच्या खंडणीची मागणी, तासाभरात सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टेबल टेनिसचा क्लास उरकून घरी निघालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या १० वर्षांच्या जुळ्या मुलांचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली. मात्र, अवघ्या तासाभराच्या आत पोलिसांनी मुलांची सुटका केली. चौकशीत मुलीचे लग्न थाटात करण्यासाठी एक कोटीच्या खंडणीसाठी विश्वासू चालकानेच अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या प्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
जुहू परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाची १० वर्षांची जुळी मुले कारमधून अंधेरी येथे नेहमीप्रमाणे टेनिसच्या क्लाससाठी गेली हाेती. २५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचा चालक डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धडकला. हंबरडा फोडत त्याने, मुलांना कारमधून घरी घेऊन जात असताना एक तरुण कारमध्ये घुसला. त्याने चाकूच्या धाकाने मुलासह मला औषधी गोळ्या खाण्यास भाग पाडले. चालत्या वाहनात मुलांचे हातपाय बांधले. पुढे क्रोमा मॉल परिसरात त्यातील एका मुलाला तेथे उभ्या असलेल्या शाळेच्या बसमध्ये कपड्याने बांधून बसविले. दुसऱ्याला पीव्हीआर सिनेमासमोर कार पार्क करून ठेवले. मलाही मारहाण केली, पण मी तावडीतून पळ काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तत्काळ त्याच्यासह घटनास्थळ गाठले.
तेथे उभ्या गाडीत एक अपहृत मुलगा हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. त्याची सुटका करून पथक पुढील तपासासाठी रवाना होण्याच्या तयारीत असतानाच अन्य मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घरी संपर्क साधल्याची माहिती त्यांना मिळाली.
पुढे आरोपींच्या शोधासाठी सहायक आयुक्त ज्योत्सना रासम, डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी चालकाकडेच तपासणी सुरू केली. घटनाक्रमात तफावत जाणवत असल्याने त्याच्यावरचा संशय वाढला. त्यात एकाच व्यक्तीने एवढे सगळे केले यावर विश्वास बसत नव्हता. तब्बल १८ तासांच्या चौकशीअंती चालकाने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या मुलीचे लग्न ठरले होते. लग्न थाटामाटात करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. मालकाकडे मदत मागण्याऐवजी त्याच्याकडे खूप पैसे असल्याने त्याने अपहरणाचा बनाव करत पैसे उकळण्याचे ठरवले.
- अॅपद्वारे इंटरनॅशनल कॉल
अपहरणासाठी चालकाने दिल्लीतील मेव्हण्याला एक आठवड्यापूर्वी मुंबईत बोलावून घेतले. मेव्हण्याने एका मोबाइल कंपनीत काम केले असल्याने त्याला तांत्रिक बाबींबाबत माहिती होती. अपहरण केल्यानंतर त्याने एका अॅपद्वारे बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीला फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीला परदेशातून फोन (इंटरनॅशनल कॉल) आल्याचे वाटले होते.
....
चालकाकडे १० वर्षांपासून नोकरी
आरोपी चालक व्यावसायिकाकडे १० वर्षांपासून नोकरीला होता. त्याआधी व्यावसायिकाच्या आजोबांकडे काम करीत होता.