Join us  

नाट्य संमेलनाध्यक्षांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:40 AM

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक पार पडल्यावर, नाट्य परिषदेला ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे वेध लागले आहेत. प्रसाद कांबळी यांची नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर, नाट्य संमेलन घेण्यास प्राधान्य देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक पार पडल्यावर, नाट्य परिषदेला ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे वेध लागले आहेत. प्रसाद कांबळी यांची नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर, नाट्य संमेलन घेण्यास प्राधान्य देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज, १९ एप्रिल रोजी संध्याकाळी घेण्यात येणाऱ्या नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी व नियामक मंडळाच्या बैठकीत, ९८व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.कीर्ती शिलेदार, श्रीनिवास भणगे आणि सुरेश साखवळकर या तिघांमध्ये नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चुरस रंगणार आहे. वास्तविक, नाट्य परिषदेच्या अलीकडे झालेल्या निवडणुकीपूर्वीच नाट्य संमेलनाध्यक्षांच्या निवडप्रक्रियेचे बहुतांश कार्य पार पडले होते. केवळ त्याबाबत बैठकीत विचारविनिमय करून अध्यक्षांचे नाव जाहीर करण्याचा अंतिम निर्णय बाकी राहिला होता. नाट्य परिषदेच्या निवडणुकीमुळे आता अधक्ष निवडीचा मार्गही मोकळा झाला आहे.नाट्यसंमेलनाध्यक्ष हे प्रतिष्ठेचे पद असल्याने संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ नये, अशी प्रथा नाट्य परिषदेत गेली चार वर्षे प्रचलित आहे. त्यामुळे या वेळीही निवडणूक टाळून चर्चेअंती निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत. नाट्य संमेलनाचा अध्यक्ष एकमतानेच निवडला जाईल का, याबद्दलची उत्सुकता कायम आहे.बैठकीकडे लक्ष- ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी नाट्य परिषदेच्या आधीच्या कार्यकारिणीकडे नाशिक, जळगाव व संगमनेर या ठिकाणांहून नाट्य संमेलनाच्या आयोजनाबाबत प्रस्ताव आले होते.- नव्या कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत त्यावरही विचार करण्यात येणार असून, अजून काही स्थळांचे प्रस्ताव आल्यास त्यावरही चर्चा होऊ शकते, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली. नाट्य परिषदेच्या या बैठकीत नाट्य संमेलनाध्यक्ष आणि संमेलनस्थळ या दोन्हींबाबत विचार होणार असल्याने, एकूणच या बैठकीकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :महाराष्ट्र