Join us

जकात नाक्याची बनावट वेबसाईट; दोघे गजाआड

By admin | Updated: September 29, 2015 03:14 IST

जकातीचे आॅनलाइन पेमेंट करण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करून आयातदारांना गंडा घालणाऱ्या दुकलीला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे

मुंबई : जकातीचे आॅनलाइन पेमेंट करण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करून आयातदारांना गंडा घालणाऱ्या दुकलीला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. अमय कबदुले (२५) आणि अ‍ॅन्थोनी डिसूजा (४४) अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांची चौकशी सुरू आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जकात विभागाच्या संगणकीकरणाचे कंत्राट मे. विदर्भ इन्फोटेक प्रा.लि. यांना देण्यात आले आहे. जकात नाक्यावर वाहने थांबवून नेहमी ये-जा करणाऱ्या बड्या आयातदारांना रोखीने पेमेंट करणे शक्य नसते. त्यांच्यासाठी ई-पेमेंटची सुविधा करण्यात आली. त्यासाठी शासनाने ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. एमसीजीएआॅक्ट्राय.कॉम’ ही वेबसाईट तयार केली होती. यापूर्वी जकात नाक्यावर काम करत असलेल्या डिसूजाला याबाबत पूर्ण माहिती होती. जकात नाक्यावरील नोकरी सोडल्यानंतर त्याची भेट वेब डिझाईनिंगचे काम करणाऱ्या कबदुलेशी झाली. त्याने या वेबसाईटबाबत कबदुलेकडे चर्चा केली. यातून दोघांनी मिळून ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. एमसीजीएआॅक्ट्राय. इन’ ही बनावट वेबसाईट तयार केली. याबाबत जकात अधिकाऱ्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार शुक्रवारी सायबर पोलिसांनी सापळा रचून या दुकलीच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)