उरण : शहरातील इंडिया इन्फोलाइन फायनान्स लि. कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी पहाटे सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न सतर्क वॉचमनच्या प्रतिकारामुळे फसला. फरार झालेल्या पाच दरोडेखोरांना पकडले असून न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी रात्री २.१५ सुमारास उरण शहरातील इंडिया इन्फोलाइन फायनान्स लि. कंपनीच्या पायरीवर वॉचमन गणपत वाघमारे ड्युटी करत असताना पाच सशस्त्र दरोडेखोरांनी हातातील हत्यारांचा धाक दाखवित चूप बैठो, नही तो मार डालेंगे सांगत कार्यालयाचे शटर्स आणि त्याचे कुलूप तोडण्यास सुरुवात केली. यावेळी वाघमारे यांनी दंडुक्याच्या जोरावर दरोडेखोरांशी जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे दरोडेखोर पळून गेले. वॉचमन गणपत वाघमारे यांनी घडलेली घटना वरिष्ठांना कळविल्यानंतर त्यांनी उरण पोलीस ठाण्याला तत्काळ खबर दिली. उरण नियंत्रण कक्षातून संदेश मिळाल्यानंतर उरणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉचमनच्या मदतीने शफीक मो. नुरुद्दीन शेख, सजाऊल हक अब्दुल हुदूस शेख, अहमद अब्दुल मजीद हुसेन, हशीम रोजा इर्षाद शेख, आझाद मंसुर शेख या पाच संशयित दरोडेखोरांनाहत्यारासह अटक केली.
उरणमध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला
By admin | Updated: November 10, 2014 01:15 IST