Join us

तिकिटासाठी द्राविडी प्राणायाम

By admin | Updated: May 23, 2016 03:24 IST

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन रेल्वे स्थानकात प्रवाशांची तिकीट मिळवण्यासाठी त्रेधातिरपीट होत आहे. एकच तिकीटघर असल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढून ट्रेन

मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन रेल्वे स्थानकात प्रवाशांची तिकीट मिळवण्यासाठी त्रेधातिरपीट होत आहे. एकच तिकीटघर असल्याने सीएसटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढून ट्रेन पकडण्यासाठी स्थानकालाच प्रदक्षिणा घालावी लागत आहे.उंचावर असलेल्या कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १शेजारी तिकीटघर आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २खाली असलेले तिकीटघर गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १शेजारी असलेल्या एकमेव तिकीटघरातून तिकीट काढलेले प्रवासी जीव धोक्यात घालून थेट रूळ ओलांडून प्लॅटफॉर्म क्रमांक २ गाठत होते. मात्र रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावर बारा डब्यांची लोकल सुरू करण्यासाठी स्थानकाची लांबी वाढवली. सोबतच प्रवाशांनी रूळ ओलांडू नये, म्हणून दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये तारेचे कुंपण बसवले. त्यामुळे तिकीट काढल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक २ गाठण्यासाठी प्रवाशांना स्थानकाखालून वळसा घालून जाण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. शिवाय प्रवाशांच्या वेळेचेही नुकसान होत आहे.स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म क्रमांक २ खालील तिकीटघर पुन्हा सुरू करावे, म्हणून या ठिकाणी सह्यांची मोहीमही राबण्यात आली होती. मात्र प्रशासनाने त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. घाईगडबडीत प्रवासी रेल्वे रुळावर बसवलेले तारेचे कुंपणही ओलांडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता बळावली आहे. (प्रतिनिधी)