Join us  

डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा सुहास पेडणेकर यांनी स्वीकारला भार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 1:24 AM

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ मुंबई येथील प्रथम कुलगुरू पदाचा पदभार मंगळवारी, १४ मे रोजी स्वीकारला.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ मुंबई येथील प्रथम कुलगुरू पदाचा पदभार मंगळवारी, १४ मे रोजी स्वीकारला. शुक्रवार, १० मे २०१९ रोजी शासन आदेशानुसार प्रा. सुहास पेडणेकर यांची डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ मुंबई येथील प्रथम कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र शासनाने नव्याने स्थापन केलेल्या या विद्यापीठात प्रमुख महाविद्यालय म्हणून शासकीय विज्ञान संस्था मुंबई आणि घटक महाविद्यालये म्हणून एलफिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय, मुंबई यांचा समावेश आहे. शासकीय विज्ञान संस्थेच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून चार महाविद्यालयांच्या समूहाने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठासंदर्भातील पार्श्वभूमी विशद केली. तसेच या विद्यापीठाची ध्येयधोरणे आणि भविष्यकालीन वाटचालींवर प्रकाश टाकला. बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार आणि काळाच्या गरजेनुसार अधिकाधिक कौशल्यधारित आणि रोजगाराक्षम अभ्यासक्रम राबविणे ही या विद्यापीठाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. तर आंतरज्ञानशाखीय उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे अभ्यासक्रम, संशोधनाची गरज त्यांनी अधोरेखित केली. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठ मुंबई समोरील संभाव्य आव्हानांवर यशस्वी मात करण्यासाठी सर्वच स्तरातून सहभाग आणि सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :मुंबई