Join us  

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींच्या संकल्पाची पूर्तता करणारे पंतप्रधान मोदी हे नव्या भारताचे शिल्पकार- अमरजित मिश्रा

By मनोहर कुंभेजकर | Published: June 24, 2023 5:37 PM

अमरजित मिश्रा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या कार्यसंस्कृतीला मूर्त रूप देतात.

मुंबई- देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीं यांनी बलिदान दिले. त्यांच्या संकल्पाची पूर्तता करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे शिल्पकार आहेत असे प्रतिपादन मुंबई भाजपा उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री अमरजित मिश्रा यांनी  केले. दीपकमल फाऊंडेशनच्यावतीने दादर येथील सावरकर सभागृहात 'मुखर्जी से मोदी तक.. संकल्प से सिद्धी तक' या विषयावर चर्चासत्राचे काल आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते शहीद सुधाकर भट यांच्या शूरपत्नी प्रतिभा भट आणि ईशान्य भारतातील सामाजिक कार्यकर्ते अतुल कुलकर्णी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

अमरजित मिश्रा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या कार्यसंस्कृतीला मूर्त रूप देतात. त्यांनी घरात घुसून शत्रूला मारणारा, धडा शिकवणारा नवीन भारत उभा केला. आता आपली वाटचाल डिजिटल इंडियाच्या दिशेने होते आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सशक्त राष्ट्र उभारणीचे स्वप्न पाहिले. 'अंत्योदय से राष्ट्रोदय' हा राष्ट्रीय संकल्प त्यांनी केला होता. आता त्याची पूर्तता होत आहे.

 आशिष शेलार यांनी काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, भाजपला प्रश्न विचारला जातो की, स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही कुठे उभे होते?  पण मुळात आमचा त्यांना प्रश्न आहे, तुम्ही कोणत्या जगात राहता?  तुमच्या पक्षाचा जन्म १९६० मध्ये झाला. स्वातंत्र्यलढ्यातील आपला सहभाग काय? भाजपाचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग समजून घेण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन समजून घ्यावे लागेल.  

पुढील वर्षी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हुतात्मा दिनापूर्वीच त्यांच्या जीवन संघर्षावर लिहिलेली पुस्तके मातोश्री, सिल्व्हर ओक आणि नाना पटोले यांना पाठवणार आहोत. जेणेकरून त्यांना डॉ. मुखर्जी यांच्याविषयी वाचता येईल. त्यानंतर भाजपाचे स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर योगदान काय होते ते कळू शकेल असे त्यांनी ठणकावून सांगितले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा खोटा दावा करणाऱ्यांनी गेल्या आठवड्यात शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली.  इतर देशात ज्या हिंदूंवर अन्याय झाला आहे, त्यांच्यासाठी काय कायदा आहे, हे उद्धव ठाकरेंनी सांगावे, असा सवाल त्यांनी केला. ते देशाचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांच्या विरोधात असल्याचे आ. ॲड. शेलार म्हणाले.  ज्यांनी देशासाठी बलिदान दिले आणि संपूर्ण आयुष्य हिंदूंसाठी वेचले अशा लोकांचा आज भाजप सन्मान करत आहे.  उबाठा आणि भाजपमध्ये हाच फरक आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये असेही ते म्हणाले.

टॅग्स :भाजपा