Join us  

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: पंधरा दिवसांपूर्वीच पिस्तूल दिले भाऊजीला; सीबीआय चौकशीत उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 2:36 AM

धश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित आरोपी सचिन अंदुरे याने १५ दिवसांपूर्वीच त्याच्याकडील पिस्तुल भाऊजी शुभम सूर्यकांत सुरळेकडे दिल्याची माहिती शुभमच्या चौकशीतून उघड झाली आहे.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित आरोपी सचिन अंदुरे याने १५ दिवसांपूर्वीच त्याच्याकडील पिस्तुल भाऊजी शुभम सूर्यकांत सुरळेकडे दिल्याची माहिती शुभमच्या चौकशीतून उघड झाली आहे. अंदुरेच्या अटकेचे वृत्त समजताच शुभमने ते पिस्तुल चुलत भाऊ अजिंक्य शशिकांत सुरळेकडे सोपविले. शुभमच्या सांगण्यावरुन ते रोहित रेगेकडे लपवण्यासाठी देण्यात आले. त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वीच तो सीबीआयच्या जाळ्यात अडकला आणि ते पिस्तुल हाती लागले. याबाबत सीबीआयने बुधवारी पुरवणी जबाब दिला आहे.राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) मदतीने सीबीआयने शनिवारी अंदुरेला अटक केली. त्याची चौकशी सुरु असतानाच, सीबीआयने त्याच्या नातेवाईकांना टार्गेट केले. त्यासाठी मंगळवारी एटीएसच्या मदतीने औरंगाबाद परिसरात छापे टाकले. त्यामध्ये अंदुरेचा औरंगाबादच्या औरंगपुरामधील भाऊजी शुभमच्या संशयास्पद हालचाली त्यांनी हेरल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत १५ ते २० दिवसांपूर्वीच अंदुरेने औरंगाबादच्या औरंगपुरामध्ये राहणारा भाऊजी शुभमकडे ते पिस्तुल लपवून ठेवण्यासाठी दिले.एटीएसने नालासोपाऱ्यातील बॉम्ब, स्फोटकांप्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर यांना अट केल्यानंतर त्याने हेपिस्तुल शुभमकडे दिल्याचे समजते. पुढे सीबीआयने अंदुरेला अटक करताच घाबरलेल्या शुभमने ते पिस्तुल चुलतभाऊ अजिंक्यकडे दिले. त्याने ते अंदुरेचा जीवलग मित्र रोहितकडे लपवून ठेवण्यासाठी दिले. त्याने पिस्तुलाची विल्हेवाट लावण्यापूर्वी सीबीआय आणि एटीएस मंगळवारी पहाटेच रोहितकडे पोहचले. त्यांनी त्याच्या घरातून काळ्या रंगाची पिस्तुल, केएफ लिहिलेले ७.६५ मिमी बोअरचे पिस्तुल, तीन जीवंत काडतुसे, रिकामे पोते, तलवार, कुकरी, दोन मोबाईल जप्त केले. यातील अंदुरेने शुभमकडे सोपविलेले पिस्तुल हे दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्याचा आल्याचा संशय सीबीआयला आहे.त्यानुसार, त्यांनी केएफ लिहिलेले ७.६५ मिमी बोअरच्या पिस्तुलासह अन्य जप्त केलेली हत्यारे तपासणीसाठी ताब्यात घेत न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविली आहेत. याच पिस्तुलातून गोळीबार केला का? त्याचे काडतुस आणि दाभोलकर यांच्या हत्येनंतर घटनास्थळावरुन हस्तगत करण्यात आलेल्या पुंगळ्या यात साम्य आहे का? याची तपासणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत होत आहे. हे सर्व साहित्य जप्त केल्यानंतर शुभम, रोहित आणि अजिंक्य यांना हत्यारबंदी कायद्याअंतर्गत औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे....म्हणून पुरवणी जबाबाचा आधारसीबीआयने मंगळवारी दिलेल्या जबाबात अंदुरेच्या चौकशीतून पिस्तुलाबाबत माहिती मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र ते अनवधानाने झाल्याचे म्हणत सीबीआयने बुधवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात पुरवणी जबाब दिला. ही माहिती शुभमच्या चौकशीतून उघड झाली आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आल्याचे पुरवणी जबाबात म्हटले आहे.

टॅग्स :नरेंद्र दाभोलकरखून