Join us  

११ हजार घरं प्रकाशमान! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 3:20 PM

Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana : नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरू असून राज्यात आतापर्यंत ११ हजार ३६३ नवीन घरगुती वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 

मुंबई : घरगुती वीजजोडणी नसलेल्या अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’तून नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरू असून राज्यात आतापर्यंत ११ हजार ३६३ नवीन घरगुती वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून दि. १४ एप्रिल २०२१ पासून ही योजना सुरू करण्यात आली. गेल्या ९ महिन्याच्या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरु करण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी सुरु आहे. 

राज्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करीत महावितरणकडून अनुसूचित जातीमधील ७ हजार ४३९ आणि जमातीमधील ३ हाजर ९२४ अशा एकूण ११ हजार ३६३ नवीन घरगुती वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. नागपूर प्रादेशिक विभागात सर्वाधिक ४ हजार १०६, कोकण प्रादेशिक विभाग- २ हजार ८९९, औरंगाबाद प्रादेशिक विभाग– २ हजार ६४१ आणि पुणे प्रादेशिक विभागात १ हजार ७१७ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर सद्यस्थितीत राज्यातील १ हजार ६९१ वीजजोडण्या देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता, वीजजोडणीच्या जागेची तांत्रिक तपासणी, विद्युत संच मांडणीचा चाचणी अहवाल, विद्युत पायाभूत सुविधा उभारणी आदींबाबत कार्यवाही सुरु आहे. 

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मध्ये लाभार्थी अर्जदारांना घरगुती वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. या वीजजोडणीसाठी महावितरणकडे केवळ ५०० रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजजोडणीचा अर्ज महावितरणकडून मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी तसेच इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधीत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल. 

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन घरगुती वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

टॅग्स :वीजमुंबई