Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात धावणार ‘डबल डेकर’

By admin | Updated: August 12, 2014 23:18 IST

वाढत्या गर्दीसाठीचा पर्याय : कोकण रेल्वे व्यवस्थापनाची जोरदार तयारी सुरू

रत्नागिरी : गणेशोत्सवात कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वे मार्गावर नवीन वातानुकूलित डबल डेकर ट्रेन ‘हॉलिडे स्पेशल’ म्हणून चालविण्यास रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात ही रेल्वे सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबई व कोकणची नाळ घट्ट जुळली आहे. कोकणातील प्रत्येक घरांतील कोणीना कोणी नोकरीनिमित्त मुंबईत स्थलांतरित झालेले आहेत. त्यांना पूर्वी केवळ एस.टी.बस व खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत होते. मात्र, कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर त्यांच्यासाठी कमी खर्चातील पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यांच्या कोकणातील फेऱ्याही वाढल्या आहेत.पूर्वी नागपंचमी, गोकुळाष्टमी यासारख्या सणांना सहसा न येणारे मुंबईकर आता कोकण रेल्वेमुळे प्रवास सोपा झाल्याने सर्वच सणांना हजेरी लावताना दिसत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेतील गर्दीचे प्रमाण कायम वाढत आहे. त्यातच एस.टी.बसचे तिकीटदर सातत्याने वाढत असल्याने व ते परवडेनासे असल्याने पहिली पसंती कोकण रेल्वेलाच आहे.