Join us

कलारसिकांसाठी जहांगीर कलादालनाचे द्वार पुन्हा खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:07 IST

मुंबई - कोरोना संक्रमणाचा धोका असल्यामुळे मागील वर्षभरापासून बंद असलेले कुलाबा येथील जहांगीर कलादालन पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले होणार ...

मुंबई - कोरोना संक्रमणाचा धोका असल्यामुळे मागील वर्षभरापासून बंद असलेले कुलाबा येथील जहांगीर कलादालन पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले होणार आहे. कला क्षेत्रातील विद्यार्थी आणि कलाप्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे. कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी असलेले हे हक्काचे दालन तब्बल ११ महिन्यांनी खुले होणार असल्याने कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मागीलवर्षी १५ मार्चपासून बंद करण्यात आलेले जहांगीर कलादालन कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. १६ फेब्रुवारीपासून येथे ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस‌्,’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस‌्’चे विजेते बिभूती अधिकारी यांच्या ‘फेथ ॲण्ड फ्युरी’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. आर्टिस्ट, स्कल्पचर, कार्टूनिस्ट बिभूती अधिकारी हे मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. पहिल्यांदाच पीव्हीसी पाईप्सचा वापर करत त्यांनी काढलेली चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील.

‘द रोलिंग पेंटिंग’मधून अनोखी कलापर्वणी

निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारे जगातले पहिले इनोव्हेटिव्ह पेंटिंग ‘द रोलिंग पेंटिंग’ या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. ५९४ पीव्हीसी पाईप्सचा वापर करून ५ बाय ३ फुटाची ही पेंटिंग तयार केली आहे. प्रत्येक पीव्हीसी पाईपवर निसर्ग, हरीण, पक्षी, वाघ, मोर अशी जैवविविधता रेखाटण्यात आली आहे. विशिष्ट पद्धतीने या पाईप रोल केल्यावर तब्बल १२ विविध पेंटिग्ज पाहायला मिळतील. अशा पद्धतीची पेंटिंग कलारसिकांना प्रथमच बघायला मिळणार आहे.