Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या निधीच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप नको- समाज कल्याण कार्यालयाचा इशारा

By स्नेहा मोरे | Updated: October 18, 2023 19:34 IST

विद्यार्थ्यांची अडवणूक केल्यास महाविद्यालय, विद्यापीठांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतील शिष्यवृत्तीचा निधी मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी, राज्यातील काही विद्यापीठ आणि महाविद्यालयांना या संदर्भात विद्यार्थ्यांची अडवणूक केल्याच्या तक्रारी आणि प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांची अडवणूक केल्यास त्या महाविद्यालय वा विद्यापीठांवर कारवाई करण्याचे आदेश समाज कल्याण कार्यालयाने दिले आहेत.

केंद्र सरकारमार्फत अनुसूचित जाती विमुक्त जाती, भटक्या जमाती व मागास प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल कातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र अनेकदा शिष्यवृत्तीचा निधी मात्र विद्यापीठ आणि महाविद्यालयांना मिळण्यास उशीर होतो. अशा वेळेस महाविद्यालय, विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची कागदपत्र वा शिष्यवृत्ती प्रक्रियेत अडवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेतील अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीवर वा गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून आता समाज कल्याण कार्यालयाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून अशा तक्रारी आल्यास त्वरित अनुसूचित जाती-जमाती व अत्याचार प्रतिबंध अधिनियमाद्वारे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

याउलट शिष्यवृत्तीच्या या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर मदत करण्याच्या सूचनाही समाज कल्याण कार्यालयाने दिल्या आहेत. त्यात आधार कार्डचा क्रमांक बँकेशी जोडणे, आधार संलग्न असलेले बँक खाते बंद करणे, विद्यार्थ्यांना व्हाऊचर रिडिम न करणे अशा समस्या भेडसावत असल्यास विद्यार्थ्यांना मदत करावी असे सूचित केले आहे.

टॅग्स :समाजकल्याण उपायुक्त कार्यालय