Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरे रुग्णालयाचे खाजगीकरण करू नका; आरेवासीयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 15, 2023 18:23 IST

आरे कॉलनी 27 आदिवासी पाडे आणि 46 झोपडपट्टी आहे.

मुंबई- आरे कॉलनी 27 आदिवासी पाडे आणि 46 झोपडपट्टी आहे. आरे रुग्णालय 5 फेब्रुवारी 2016 रोजी शासनाच्या दुग्धविकास विभागाने परिपत्रकाद्वारे आरे रुग्णालय महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली. परंतू आरे रुग्णालय ताब्यात घेण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला होता. परिणामी दुग्ध विकास विभाग आणि पालिका प्रशासन यांच्या वादात आजही आरेत आरोग्य सुविधांचा अभाव आहे.

1971 साली सुरू झालेले आरे रुग्णालय येथील युनिट क्रमांक 16 मध्ये 1932 चौरस मीटर जागेत आहे या रुग्णालयातील डॉक्टर नर्स ऑफ फार्मासिटिस यांचे  वेतन सार्वजनिक आरोग्य विभाग देते.  परंतू आता आरेच्या दुग्ध विकास विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी हे रुग्णालय खाजगी संस्था यांना  देण्यासाठी दि, 10 ऑक्टोबर रोजी वर्तमानपत्रात जाहिरात दिली असून प्रस्ताव सादर करण्यासाठी फक्त आठ दिवसाची मुदत  दिली आहे. 

आरे रुग्णालयाचे खाजगीकरण करू नये, तसेच हे रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागास चालवण्यात देण्यात यावे. किंवा आरोग्य सेवा- सोयीयुक्त आपला दवाखाना आरे रुग्णालयात सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल कुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.लोकमत ऑनलाईन मध्ये दि,10 जून 2023 रोजी यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.

वर्तमानपत्रात जाहिरात देणे हा फक्त देखावा असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अगोदरच एका संस्थेला सदर हॉस्पिटल चालवण्यात देण्यासाठी ठरवले आहे असा सणसणीत आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांनी केला आहे.आरेतील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आपण 2014 साली आंदोलन केले होते आणि या प्रकरणी आपण सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. आरेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा निर्णय कोणाच्या आदेशाने घेतला, जर खाजगी संस्था हे रुग्णालय व्यवस्थित चालू शकले नाही आणि मध्येच बंद केले तर याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :मुंबईआरे