Join us

मासिकपाळीदरम्यान लस घेऊ नये, ही व्हायरल पोस्ट खोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:07 IST

तथ्य नसल्याची वैद्यकीय तज्ज्ञांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिलांनी मासिकपाळीच्या पाच दिवस आधी किंवा पाच दिवस ...

तथ्य नसल्याची वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिलांनी मासिकपाळीच्या पाच दिवस आधी किंवा पाच दिवस नंतर काेरोनाची लस न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे केल्यास महिलांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांमध्ये लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र, या पोस्टमध्ये तथ्य नसून समाजमाध्यमांवरील अशा चुकीच्या माहितीपासून सावध राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

समाजमाध्यमांत व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यात नमूद केल्याप्रमाणे ‘१८ वर्षांवरील सर्वांसाठी १ मेपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुलींसाठी हे फार महत्त्वाचे आहे की, त्यांनी मासिकपाळीनुसारच लस घेण्यासाठी जावे. मासिकपाळीच्या ५ दिवस आधी किंवा नंतर मुलींनी लस घ्यायला जाऊ नये. या काळात तुमची प्रतिकारशक्ती कमी असते. लसीच्या डोस आधी तुमची प्रतिकारशक्ती कमी करतो. कालांतराने तुमची प्रतिकारशक्ती वाढू लागते. त्यामुळे मासिकपाळीच्या काळात लस घेतल्यास धोका उद्भवू शकतो’, असा दावा या पोस्टमध्ये कऱण्यात आला आहे. तसेच, मित्रमंडळींपर्यंतही हा मेसेज पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी खडपे यांनी सांगितले, मासिकपाळीदरम्यान लस घेतल्यास आरोग्यास कोणताही धोका नाही. मासिकपाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे संसर्गाच्या तीव्र काळात समाजमाध्यमांवरील कोणत्याही पोस्टवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये. लस घेतल्यामुळे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही, याबाबत कुठलाही गैरसमज महिलांनी करून घेऊ नये. कोविडपासून संरक्षणासाठी आपली वेळ आल्यावर त्वरित लस घेणे आवश्यक आहे.

* केंद्राच्या आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

सोशल मीडियावरून एक खोटी पोस्ट व्हायरल होत असून त्यामध्ये मासिकपाळीच्या ५ दिवस आधी आणि नंतर लस न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण, अफवांना फसू नका. १ मेनंतर १८ वर्षांवरील सर्वांनीच लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. आरोग्य सेतू मोबाइल ॲप आणि cowin.gov.in या संकेतस्थळावर २८ एप्रिलपासून लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

..........................