Join us

तोतया डॉक्टरने घातला लाखोंंचा गंडा

By admin | Updated: February 15, 2015 00:18 IST

दिल्लीतील मेरू टॅक्सीचालकाने प्रथितयश डॉक्टर असल्याचे भासवत मुंबईत अनेकांना लाखो रुपयांंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मनीषा म्हात्रे ल्ल मुंबईदिल्लीतील मेरू टॅक्सीचालकाने प्रथितयश डॉक्टर असल्याचे भासवत मुंबईत अनेकांना लाखो रुपयांंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची फसवणूक केल्यानंतर या टॅक्सीचालकाचे भांडे फुटल्याने भांडुप पोलिसांनी त्याला अटक केली.सिद्दिकी मोहम्मद अब्दुल (३५) असे या टॅक्सीचालकाचे नाव आहे. तो मूळचा केरळचा. उदरनिर्वाहासाठी तो दिल्लीत पोहोचला. तेथे त्याला टॅक्सी चालकाचे काम मिळाले. मात्र त्या कामासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि चालक परवाना त्याच्याकडे नव्हता. त्याच्या एका मित्राने त्याला ही बनावट कागदपत्रे बनवून दिली. त्या कागदपत्रांंच्या आधारे अनेकांना गंडा घालता येतो, हे लक्षात आल्यानंतर तो मुंबईत दाखल झाला.डॉक्टर सिद्दिकी अब्दुल असे खोटे नाव धारण करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल झालेल्या या ठगाने कांजूरमार्गमधील एका फ्लॅटचे मालक मिलिंद कुलकर्णी यांंच्याशी संपर्क केला. त्याचे भाडेकराराचे सर्व व्यवहार सैन्य दलातील निवृत्त अधिकारी जेकब मॅथ्यू हे बघत असल्याने त्यांंची भेट घेण्यास कुलकर्णी यांनी सांगितले. आपले आईवडील आॅस्टे्रलिया येथे राहत असून सिडनी विद्यापीठात त्यांंची ओळख आहे. त्यामुळे तुमच्या मुलाला सिडनी विद्यापीठातून मोफत शिष्यवृत्ती मिळवून देतो, असे आमिष त्याने मॅथ्यू यांना दाखवले. सुरुवातीला अर्जासाठी ३४ हजार घेतले, त्यानंतर मुलाच्या विमान तिकिटासाठी ३ लाखांची मागणी केली. काही ना काही कारण पुढे करून ४ लाख ६८ हजार उकळले. हळूहळू मॅथ्यू यांना संशय येऊ लागला. त्यांनी सिद्दिकीने दिलेल्या कागदपत्रांंची पडताळणी केली असता या ठगाचा प्रताप समोर आला. त्यांनी तत्काळ भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक प्रताप चव्हाण यांंच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नितीन गिजे यांंच्या पथकाने कांजूरच्या घरातून सिद्दिकीच्या मुसक्या आवळल्या. फसवणुकीच्या गुन्ह्यात सिद्दिकीला अटक केल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली. सिद्दिकी हा आपल्या पत्नीसह कांजूरच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. मुंबईतील दोन विमानतळांवर वाइन शॉप, राजधानी एक्स्प्रेससह ८० मोठ्या रेल्वे गाड्यांत कॅटरिंगचा व्यवसाय, रुणवालच्या बांधकामाधीन इमारतीत दोन फ्लॅट बुक केल्याची माहिती तो सर्वांना देत होता. त्याच्याकडील मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.