Join us
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

By admin | Updated: May 2, 2015 22:42 IST

ठाण्यात झालेल्या युवतीच्या ‘त्या’ घटनेनंतर ठाणे परिसरातील रिक्षामालकांना ठाणे पोलिसांतर्फे प्रत्येकास विशेष ओळखपत्र (स्मार्टकार्ड) देण्याची योजना सुरू करण्यात आली

अनिकेत घमंडी, डोंबिवलीठाण्यात झालेल्या युवतीच्या ‘त्या’ घटनेनंतर ठाणे परिसरातील रिक्षामालकांना ठाणे पोलिसांतर्फे प्रत्येकास विशेष ओळखपत्र (स्मार्टकार्ड) देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेस कल्याण-डोंबिवली परिसरातून थंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीचा अभाव यासह रिक्षाचालक-मालकांमध्येही याबाबतचे फारसे गांभीर्य नसल्याचे आढळून येत आहे.शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीत सुमारे ५ हजार अधिकृत रिक्षा आहेत. त्यापैकी आतापर्यंत अवघ्या १४५० रिक्षामालकांचीच माहिती मिळाली असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या स्मार्टकार्ड संकल्पनेबाबत विभागीय पोलीस उपायुक्तांनी ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक पोलिसांना संबंधित ठिकाणी सर्व रिक्षामालकांशी संवाद साधून ही माहिती लवकरात लवकर मिळवावी, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, दैनंदिन काम करून हे अतिरिक्त काम करण्यासाठी पोलीस यंत्रणेने रिक्षामालकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे केले आहे. डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यांत काहींनीच या सुविधेचा लाभ घेतला आहे.